डाळिंब पिकांसाठी विमा मंजूर

डाळिंब पिकांसाठी विमा मंजूर

संगमनेर । प्रतिनिधी Sangamner

संगमनेर तालुक्यातील 1440 शेतकर्‍यांना 1063 हेक्टरवर असलेल्या डाळिंबा साठी 6 कोटी 24 लाख रुपये विमा शेतकर्‍यांना मंजूर झाला असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी सुधाकर बोराळे यांनी दिली.

यंदा ‘निसर्ग चक्रीवादळ, त्याचप्रमाणे अतिवृष्टी आणि गारपीट यामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून या शेतकर्‍यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा केला आहे.

याचबरोबर हवामानआधारित फळपीक योजनेअंतर्गत सन 2019-2020 (आंबे बहार) डाळिंब पिकांसाठी तालुक्यातील 1440 शेतकर्‍यांना 1063 हेक्टर क्षेत्राकरिता एकूण 6 कोटी 24 लाख रुपये विमा मंजूर झाला आहे. यामध्ये साकूर सर्कलकरिता 1 कोटी 10 लाख तर त्याखालोखाल तळेगाव सर्कलकरिता 80 लाख रुपये पीकविमा मिळाला आहे. तसेच आश्वी बु., धांदरफळ बु., डोळासणे, घारगाव, पिंपारणे, संगमनेर बु., शिबलापूर, समनापूर या सर्कलमधील सर्व अर्जदार शेतकर्‍यांचा समावेश आहे.

संगमनेर तालुक्यात कमी पाऊस असल्याने शेतकर्‍यांनी आधुनिक पद्धतीने डाळिंब पिकाचे उत्पादन सुरू केले असून संगमनेर तालुका हा आता डाळिंबाचे आगार बनला आहे. शेततळे व डाळिंब शेती यामुळे शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळत आहे. मात्र वातावरणातील बदलामुळे यावर्षी आलेल्या विविध रोगांमुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. मात्र शासनाच्या पीकविम्याच्या माध्यमातून होणार्‍या या मदतीने शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे.

या विम्याची रक्कम आपल्या बँक खात्यावर मिळणार असून शेतकर्‍यांनी बँकेत संपर्क साधावा, असे आवाहन थोरात साखर कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोरोळे व तालुका कृषी अधिकारी प्रशांत शेंडे यांनी केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com