करंजवण योजनेस वाढीव निधी मंजूर

15 टक्के लोकवर्गणी माफ करण्याची आ. कांदे यांची मागणी
करंजवण योजनेस वाढीव निधी मंजूर

मनमाड । प्रतिनिधी Manmad

मनमाड शहराचा ( Manmad )पाणीप्रश्न कायमस्वरुपी सुटण्यासाठी शासनाने करंजवण पाणीपुरवठा योजनेच्या ( Karanjwan Water Supply Scheme ) 311 कोटी वाढीव निधीला ( Funds )मंजुरी दिल्याची माहिती आ. सुहास कांदे यांनी दिली. योजनेसाठी 15 टक्के लोकवर्गणी भरावी लागणार असून ती माफ करावी, अशी मागणी आ. कांदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन केली. या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचे आश्वासन उपरोक्त नेत्यांनी दिल्याचे आ. कांदे यांनी सांगितले.

गेल्या 35 वर्षांपासून शहरातील नागरिक भीषण पाणीटंचाईचा सामना करत आहेत. वर्षाच्या बाराही महिने हंडाभर पाण्यासाठी दाही दिशा भटकंती करण्याची वेळ शहरातील सव्वा लाख नागरिकांवर येते. पाण्याअभावी शहराचा विकासदेखील खुंटला असल्यामुळे तुटपुंज्या पगारावर तरुणांना वेगवेगळ्या शहरांत कामासाठी जावे लागते. उच्चशिक्षण घेऊनदेखील योग्य नोकरी किंवा कामधंदा मिळत नाही. त्यामुळे अनेक तरुण निराश होऊन व्यसनांच्या आहारी गेले आहेत.

केवळ पाणी समस्येमुळे नाशिक जिल्ह्यात मालेगावनंतर सर्वात मोठे शहर असलेल्या मनमाडचा विकास झाला नाही. पालिका, विधानसभा, लोकसभा या तिन्ही निवडणुकीत पाणीप्रश्न प्रमुख मुद्दा असतो. हा प्रश्न सोडवण्यासाठी काहींनी प्रयत्न केले मात्र आजही हा प्रश्न कायम आहे. अडीच वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी उद्धव ठाकरे मनमाडला आले होते. त्यावेळी त्यांनी, तुम्ही सुहासला निवडून द्या, तुमचा पाणीप्रश्न मार्गी लावेन, असे वचन दिले होते. नशिबाने राज्यात शिवसेना सहभागी असलेल्या महाविकास आघाडीची केवळ सत्ताच आली नाही तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले.

या संधीचा फायदा घेत आ. सुहास कांदे यांनी शासन दरबारी अडकून पडलेल्या करंजवण योजनेचा पाठपुरावा सुरू केला. त्यांच्या पाठपुराव्याला यश येऊन शासनाने करंजवण योजनेला मंजुरी देत त्यासाठी 265 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. मात्र योजनेचे काम पूर्ण होईपर्यंत वस्तूंच्या किमतीही वाढतील. त्यामुळे योजनेचे बजेट वाढून ते 311 कोटींपर्यंत गेले. वाढीव निधीसाठी आ. कांदे यांनी पुन्हा कंबर कसून शासन दरबारी पाठपुरावा सुरू केला. त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाढीव निधीला मंजुरी दिली. त्यामुळे आता करंजवण योजनेची निविदा काढण्याचा मार्ग मोकळा झाला असून पुढील आठवड्यात निविदा काढली जाईल, असा विश्वास आ. कांदे यांनी व्यक्त केला आहे.

योजनेसाठी 15 टक्के लोकवर्गणी भरावी लागणार आहे. मात्र पालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे विशेष बाब म्हणून लोकवर्गणीची अट शिथिल करण्याची मागणी आ. कांदे यांनी केली असून या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. योजनेसाठी राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह संबंधित अधिकार्‍यांनीदेखील मदत केल्याचे आ. कांदे यांनी सांगून सर्वांचे मनमाडकरांच्या वतीने आभार मानले आहेत. लवकरच करंजवण योजनेच्या कामाला सुरुवात होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

Related Stories

No stories found.