
बेलगाव कुऱ्हे | Belgaon Kurhe
करोनाच्या संकटात नाभिक समाजातील बांधवांची सलून दुकाने बंद होती. यामुळे कारागिरांना प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागले आहे. यामुळे या व्यावसायिकांना अनुदान मिळावे यासाठी अर्ज करण्यात आले आहे.
दरम्यान मागील महिन्यापासून शासनाकडून फक्त केस कर्तनासाठी परवानगी मिळाली आहे. परंतु यामध्ये अनेक अटी लादण्यात आल्या आहेत. तसेच करोनाच्या भीतीमुळे ग्राहक दुकानात येण्यास अजिबात धजावत नाही. त्यामुळे अद्यापही फारसा जम बसलेला नाही. यामुळे आर्थिक नुकसान होत आहे.
या पार्श्वभूमीवर सलून कारागिरांना शासनस्तरावर दरमहा १० हजार रुपये अनुदान मिळावे यासाठी महाराष्ट्र राज्य सलून असोशिएशन च्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहे. यासाठी अनुदान अर्ज कृती समितीच्यामार्फत जमा करण्यात आले.
सलून कारागिरांची कामगार आयुक्त येथे नोंद करून समाजातील असंघटित सलून कारागिरांना आर्थिक मदत मिळण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.