पाणी पुरवठा योजनेला मंजुरी

पाणी पुरवठा
पाणी पुरवठा

नाशिक । प्रतिनिधी Nashik

सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतून पेठ नगरपंचायतीस 13.37 कोटी रुपये रकमेच्या पाणी पुरवठा योजनेला पाणी पुरवठा विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे.

अर्थमंत्री अजित पवार, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील व कृषीमंत्री दादा भुसे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पेठचे नगराध्यक्ष, शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य भास्कर गावित यांच्याशी संवाद साधून या योजनेला प्रशासकीय मान्यता दिली असल्याचे जाहीर केले. यामुळे पेठ शहरातील 2050 पर्यंतचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली लागला आहे.

पेठ शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी मागील चार वर्षांपासून भास्कर गावित पाठपुरावा करीत होते. नगराध्यक्ष मनोज घोंगे यांनीही याबाबत पाठपुरावा करीत कृषीमंत्री दादा भुसे यांच्या माध्यमातून मंत्रालयात प्रस्ताव सादर केला.

अर्थविभागाने वित्तीय सहमती दर्शवल्यानंतर पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी या पाणी पुरवठा योजनेला प्रशासकीय मान्यता दिली आहे. या योजनेसाठी 90 टक्के खर्च पाणी पुरवठा करणार असून 10 टक्के लोकवर्गणी आदिवासी उपाययोजनांमधून दिली जाणार असल्याच्या प्रस्तावासही तत्वता मान्यता देण्यात आली आहे.

या योजनेसाठी उपनगराध्यक्ष कुमार मोंढे, गटनेते बापू पाटील, संतोष डोमे यांच्यासह नगरसेवकांनी प्रयत्न केले,अशी माहिती नगराध्यक्ष मनोज घोंगे यांनी दिली.

अशी आहे योजना

* प्रति माणसी रोज 135 लिटर पाणी

* शिराळकुंड धरणात या योजनेसाठी 23 दलघफू पाणी आरक्षित

* धरणावर दोन एमएलडी क्षमतेचे पाणी शुद्धीकरण केंद्र

* पाणी उचलण्यासाठी सौर ऊर्जा प्रकल्पाचाही योजनेत समावेश

* 2050 पर्यंतची लोकसंख्या गृहित धरून योजनेची आखणी

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com