सिन्नर । Sinnar (वार्ताहर)

सिन्नर तालुक्यात माळेगाव, मुसळगाव या दोन महत्त्वाच्या औद्योगिक वसाहतींमधील (एमआयडीसी) कामगारांना उच्च दर्जाचे आणि मोफत उपचार मिळावेत यासाठी खा. हेमंत गोडसे यांच्याकडून सुरू असलेल्या पाठपुराव्याला यश आले.

केंद्र शासनाच्या श्रम व रोजगार मंत्रालयाने माळेगाव, मुसळगाव येथील औद्योगिक वसाहतींमधील कामगारांच्या आरोग्य स्वास्थ्यासाठी सिन्नर येथे तीस खाटांच्या स्वतंत्र रुग्णालयाला नुकतीच मान्यता दिली.

या रुग्णालयात एमआयडीसीत काम करणार्या शेकडो कंपन्यांमधील सेवक व त्यांच्या कुटुंबियांवर मोफत उपचार केले जाणार असल्याची माहिती खा. गोडसे यांनी दिली.

तालुक्यात मुसळगाव, माळेगाव या दोन मोठ्या औद्योगिक वसाहती आहेत. येथील कारखान्यांमध्ये सुमारे पन्नास हजार कामगार सतत कार्यरत असतात. सिन्नर, मुसळगाव, माळेगाव, वावी या ठिकाणी वर्षानुवर्षे कामगार आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. मात्र येथील सेवकांंना वैद्यकीय उपचारासाठी केंद्र शासनाकडून कोणतीही सुविधा उपलब्ध नाही.

मुसळगाव, माळेगाव औद्योगिक वसाहतींमधील कामगार आणि कुटुंबियांसाठी स्वतंत्र रुग्णालय असावे, अशी मागणी सेवकांसह वेगवेगळ्या संघटनांनी खा. गोडसे यांची भेट घेऊन केली होती. खा. गोडसे यांनी दोन वर्षांपासून केंद्राच्या श्रम मंत्रालयाकडे रुग्णालयाच्या मंजुरीसाठी पाठपुरावा सुरू केला होता.

केंद्र सरकारचे श्रम आणि रोजगारमंत्री संतोषकुमार गंगवार यांनी खा. गोडसे यांच्या मागणीची दखल घेत तीस खाटांच्या रुग्णालयाच्या प्रस्तावाला मान्यता दिली. दोन्ही औद्योगिक वसाहतींच्या मध्यभागी असलेल्या सिन्नर शहरात हे रुग्णालय उभारण्यात येणार आहे.

या रुग्णालयासाठी सिन्नर नगरपालिका किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडून भूखंड उपलब्ध करून घेण्यात येणार असून त्यानंतर रुग्णालय उभारणीच्या कामाचा प्रस्ताव राज्य शासनाकडून केंद्राकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती खा. गोडसे यांनी दिली.

यावेळी राज्य कर्मचारी विमा महामंडळ विभागाचे डेप्युटी डिरेक्टर निश्चलकुमार नाग, जितेंद्र खैरनार आदी अधिकारी उपस्थित होते.

माळेगाव, मुसळगाव या औद्योगिक वसाहतींमध्ये मोठ्या प्रमाणात कामगार, अधिकारी काम करतात. या कामगार व त्यांच्या कुटुंबियांना चांगल्या दर्जाचे मोफत उपचार मिळावेत, अशी आपली अपेक्षा होती. यासाठी आपण खा. गोडसे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. खा. गोडसे यांनी पाठपुरावा करून केंद्राच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाकडून रुग्णालय मंजूर करून आणले. ही बाब औद्योगिक वसाहतीत काम करणार्या सेवकांसाठी दिलासादायक आहे. खा. गोडसे यांच्या माध्यमातून सिन्नरकरांना नववर्षाची चांगली भेट मिळाली आहे.
राजाभाऊ वाजे, माजी आमदार

औद्योगिक वसाहतीतील सेवक व त्यांच्या कुटुंबियांसाठी स्वतंत्र रुग्णालय मिळावे यासाठी खा. गोडसे यांच्याकडे अनेकदा मागणी करण्यात आली होती. कामगारांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या मागणीचा खा. गोडसे यांनी पाठपुरावा केला व त्यांनी कामगारांसाठी 30 खाटांचे रुग्णालय मंजूर करून आणले. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रातील कामगार व त्यांच्या कुटुंबियांना आता मोफत उपचार मिळतील. उद्योजक व कामगार खा. गोडसे यांच्या कायम ऋणात राहतील.
नामकर्ण आवारे, संचालक, स्टाईस