मनपाच्या बससेवेला आरटीओची डबल बेल

प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडून अखेर मंजूरी
मनपाच्या बससेवेला आरटीओची डबल बेल

नाशिक | Nashik

महानगरपालिकेच्या बसेसेवेला खाेडा मिळत असतानाच भिजत घाेंगडे पडलेल्या या बससेवेला अखेर प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या त्रिसदस्यीय समितीने अखेर मंजूरी दिली आहे.

त्यामुळे नाशिक महानगर परिवहन महामंडळाकडून महापालिका हद्द आणि हददीच्या पलीकडील २० कि. मी. परिसरात प्रस्तावित केलेल्या विविध १४६ मार्गावर टप्पा वाहतूक करण्यास परवानगी मिळाली आहे.

नाशिक महानगर परिवहन महामंडळ मर्यादित, नाशिकने सादर केलेल्या व महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक ०८.०७.२०१९ मध्ये नमूद किमान व कमाल दरांच्या अनुषंगाने दरांची प्राधिकरणाने पडताळणी करुन पहिल्या टप्प्यास म्हणजेच ० ते २ कि.मी पर्यंत रु. १० रुपये पूर्ण आकार व ५ रुपये अर्धा आकार तसेच कमाल ५० कि. मी. पर्यंतच्या टप्यास रु. ६५/- पूर्ण आकार व ३५ रुपये अर्धा आकार इतकी आकारणी करण्यास मंजूरी देण्यात आली आहे.

शहरामध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाव्दारे प्रवासी वाहतुकीसाठी चालविण्यात येणारी शहर बस सेवा नाशिक महानगरपालिकेव्दारे सुरु करण्याचा निर्णय नाशिक महानगरपालिकेमार्फत महासभेत दि. १९.०९.२०१८ रोजी घेण्यात आला होता. नाशिक महानगर परिवहन महामंडळ मर्यादित यांनी शहर बससेवा सुरु करण्याबाबत महाराष्ट्र शासनास प्रस्ताव सादर केला होता.

त्यास शासनाने दिनांक १८ फेब्रुवारी २०२१ रोजी नाशिक महानगर परिवहन महामंडळ मर्यादित, नाशिक या उपक्रमाअंतर्गत नाशिक महानगरपालिका क्षेत्रात खाजगीकरणातून ऑपरेटर्स ची नेमणूक करुन जीसीसी तत्वावर शहर बससेवा सुरु करण्यास विविध अटी/शर्तींच्या अधीन राहून मान्यता दिली आहे.

त्यानुसार शहर व परिसरात एकूण २५० बसेसव्दारे शहर बससेवा चालू करण्यासाठी १४६ विविध मागाँवर टप्पा वाहतूकीस परवाना मिळणे व टप्पा दरास मंजूरी मिळणे असे दोन प्रस्ताव प्रादेशिक परिवहन आधिकारी भरत कळसकर, सचिव, प्रादेशिक परिवहन प्राधिकरण यांच्याकडे प्रस्ताव सादर केले होते.

याबाबत जिल्हाधिकारी तथा प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे अध्यक्ष सूरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखालील त्रिस्तरीय समितीने परिचलन पध्दतीने दि. १ जून २०२१ रोजी बैठक घेऊन नाशिक महापालिकेने सादर केलेल्या प्रस्तावावर अभ्यास करुन ठराव मंजूर केला आहे. यामुळे नाशिक शहरातील सार्वजनिक शहर परिवहन बससेवेचा मार्ग मोकळा झाला असून पर्यावरणपूरक इंधन असलेल्या व कमीत कमी दरात प्रवासाची जलद सार्वजनिक बससेवेची सुविधा नाशिककरांना उपलब्ध होणार आहे.

महानगरपालिका क्षेत्रात शहर बससेवेसाठी जीसीसी (ग्राॅस काॅस्ट कटिंग) तत्वावर दाेन ऑपरेटर्सची नेमणूक करण्यात आली आहे. बस ऑपरेटर सोबत बसची खरेदी, व्यवस्थापन, संचालन व देखभालीसाठी १० वर्षाचा करारनामा नाशिक महानगर परिवहन महामंडळ मर्यादित यांच्यामध्ये करण्यात आला आहे.

नाशिक शहर बस सेवा सुरु करण्याकरिता ट्रॅव्हेल टाइम कार रेन्टल प्रा. लि. पुणे यांच्यामार्फत ३० (मिडी डिझेल) बसेस व १२० (सी. एन. जी.) बसेसचा पुरवठा करण्यात येत असून सिटी लाइफ लाइन ट्रॅव्हेल्स प्रा. लि. दिल्ली यांच्यामार्फत २० (डिझेल) बसेस व ८० (सी. एन.जी.) अशा पर्यावरणपूरक इंधन असलेल्या बसेसचा पुरवठा करण्यात येत आहे. प्रथम टप्यामध्ये सुमारे २५० बसेस टप्या टप्प्याने सुरु करण्याचे नियोजन नाशिक महानगर परिवहन महामंडळामार्फत करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.