नाशिक । प्रतिनिधी Nashik

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ व विभागीय मंडळातील कनिष्ठलिपिक संवर्गातील एकूण 266 पदांपैकी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील उमेदवारांना वगळून इतर प्रवर्गातील 50% पदांसाठी नियुक्ती देण्यास मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे ट्विट वर्षा गायकवाड यांनी केले आहे. त्यासोबतच, शासनाचे पत्रही जोडण्यात आले आहे. त्यामुळे, आता लिपिक पदासाठी लवकरच जाहिरात निघणार असून उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य विभागातील भरतीची गुडन्यूज दिल्यानंतर, पोलीस दलातही मोठी भरती लवकरच सुरु होणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. त्यानंतर, आता शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनीही ट्विटरवरुन शिक्षण विभागातील भरतीसंदर्भात माहिती दिली आहे.

आरोग्य विभागाकडून भरती प्रकियेची जाहिरात निघाल्यानंतर पहिल्या टप्प्यातील 5300 पदांच्या भरतीची प्रक्रियाही सुरु झाली आहे, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. पोलीस खात्यात 12 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

पहिल्या टप्प्यात 5 हजार 300 जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडेल. त्यानंतर उर्वरित जागांची भरती दुसर्या टप्प्यात होईल. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी 2538 जागांची भरती झाल्यानंतर पुन्हा गरज पडल्यास आणखी सेवकांची भरती केली जाईल, असेही अनिल देशमुख यांनी म्हटले होते.