देवळा पोलिसांच्या संवेदनशीलतेचे कौतुक

देवळा पोलिसांच्या संवेदनशीलतेचे कौतुक

देवळा । प्रतिनिधी Deola

पोलीस ( Police )दलातील अधिकारी असो वा कर्मचारी; कर्तव्य निभावताना कधीही मागे वळून पाहत नाहीत. प्रसंगी जिवाची पर्वा न करता एखाद्याचे प्राण वाचवतात तर कधी कठोर होऊन गुन्हेगारांवर कारवाईचा बडगाही उगारतात. मात्र, या खाकी ( Khaki)वर्दीमागे देखील एक माणूस असतो, त्याचा प्रत्यय नुकताच देवळा येथे आला आहे.

देवळा पोलीस ठाण्याचे ( Deola Police Station ) निरीक्षक दिलीप लांडगे व पोलीस सेवकांनी आपल्या कृतिशील संवेदनशीलतेतून वाट चुकलेल्या तरुण महिलेला सुखरूप तिच्या कुटुंबात पोहोच केल्याने खाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन घडले. विशेष म्हणजे कुणाची तक्रार नसतांना पोलिसांनी या घटनेत लक्ष घातल्याने सदर महिला सुखरूप घरी पोहोचली आहे. तिच्या शोधात असलेल्या कुटुंबाला ती मिळाल्याने कुटुंबियांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, तीन -चार दिवसांपूर्वी देवळा नगरपंचायतीजवळ असलेल्या चहा-नाश्त्याच्या दुकानात एक महिला चहा मागत असल्याचे आणि ती थोडी मानसिकदृष्ट्या खचलेली असल्याचे लक्षात आल्याने तेथील गोकुळ देवरे यांनी पोलिसांना कळविले. पंजाबी ड्रेस व व्यवस्थित बोलण्यामुळे ही महिला निश्चितच वाट चुकलेली आणि चांगल्या घरची वाटल्याने तिचा तपास करायला हवा, अशा सूचना पोलीस निरीक्षक दिलीप लांडगे यांनी तातडीने पोलीस सेवकांना दिल्या.

मात्र दरम्यानच्या काळात ती परिसरात न दिसल्याने शंकेची पाल चुकचुकली. परंतु देवळा पोलीस ठाण्याचे सपोनि पुरुषोत्तम शिरसाठ, उपनिरीक्षक विक्रांत कचरे, पो.हवा. रामदास गवळी, पो.ना. ज्योती गोसावी, छाया गांगुर्डे आदींनी तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केल्याने ती शहराच्या एका बाजूस मिळून आली.

त्यांनी तिला विश्वासात घेऊन पोलीस चौकीत आणले. पो.नि. लांडगे यांनी तिला विश्वासात घेत विचारपूस केली असता ती नामपूर येथील इंदिरानगर भागातील असल्याचे तिने सांगितले. त्यानुसार जायखेडा पोलीस ठाण्याचे सपोनि श्रीकृष्ण पारधी यांच्याशी संपर्क साधून तपास करण्यास सांगितले असता घरगुती वादातून एक महिला बेपत्ता झाल्याचे कळले.

दरम्यान, सदर महिला पुन्हा बाहेर कुठे निघून जाऊ नये म्हणून तिला पोलीस ठाण्यात चहा-जेवण देत सुरक्षित ठेवण्यात आले. तिच्या कुटुंबातील सदस्यांना याबाबत कळताच त्यांनी देवळा पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी संबंधित महिला त्यांच्या घरातील सदस्य असल्याची खात्री पटल्यानंतर तिला कुटुंबियांच्या स्वाधीन केले. पोलिसांच्या संवेदनशील सतर्कतेमुळे महिला सुखरूप परतल्याने त्यांनी देवळा पोलिसांचे आभार मानत तिला घरी नेले. अत्यंत धावपळीच्या कामातही पोलिसांनी गांभीर्याने या महिलेची दखल घेतल्याने त्यांचे कौतुक होत आहे.

महिलेच्या बाबतीत माहिती मिळताच तिच्या बाबतीत कुठलीही अघटीत घटना घडू नये म्हणून तात्काळ पोलीस कर्मचार्‍यांनी तिचा शोध घेत पोलीस ठाण्यात आणले. तिची आपुलकीने विचारपूस करीत कुटुंबियांची महिती घेतली व कुटुंबियांच्या हवाली केले. समाजात वावरताना अशा काही घटना, प्रसंग, अवैध प्रकार नजरेस पडल्यास त्याबाबत तातडीने पोलिसांना कळविल्यास पुढील अनर्थ टाळता येवू शकतो. त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाने याबाबत सक्रिय राहण्याची गरज आहे.

दिलीप लांडगे पोलीस निरीक्षक, देवळा

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com