टोसिलीझुमॅब इंजेक्शन पुरवठ्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती

जिल्हाधिकारी मांढरे : तीन विभागात विभागणी
टोसिलीझुमॅब इंजेक्शन पुरवठ्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती
USER

नाशिक । Nashik

करोना रुग्णांची संख्या वाढत असून उपचारात प्रभावशाली ठरणार्‍या टोसिलीझुमॅब इंजेक्शनच्या मागणीत वाढ झाली आहे. इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी नाशिक, मालेगांव महापालिका व नाशिक ग्रामीण या तीन भागात विभागणी करण्यात आली असून त्यासाठी स्वतंत्र वैद्यकिय अधिकार्‍याची नेमणूक करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.

टोसिलीझुमॅब इंजेक्शनचा जिल्ह्यांतर्गत वितरण सक्रिय रूग्ण संख्येनुसार समन्यायी पद्धतीने होण्यासाठी यापुर्वी रेमडीसिवीर या औषधाच्या वितरणासाठी ठरविण्यात आलेली नाशिक महानगरपालिका, मालेगाव महानगरपालिका व

नाशिक ग्रामीण अशा तीन भागांमध्ये करण्यात आलेली जिल्ह्याची विभागणी कायम ठेवण्यात आली आहे.नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 23 हजार 444, नाशिक ग्रामीण क्षेत्रात 16 हजार 868 तर मालेगावात महानगरपालिक क्षेत्रात 1 हजार 707 असे एकूण 42 हजार 19 एवढी रुग्णसंख्या सक्रिय अाहे. त्या भागानुसार टोसिलीझुमॅब इंजेक्शनचा वाटपाचे प्रमाण निश्चित करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यात बाह्य रुग्ण ज्या कार्यक्षेत्रात उपचार घेत असतील त्या कार्यक्षेत्रातील कोट्यात समजण्यात येतील.

टोसिलीझुमॅब इंजेक्शन या औषधाचे स्वरूप विचारात घेता हे औषध अत्यंत तातडीच्या उपचारासाठी आवश्यक आहे. संबंधित रुग्णांची वैद्यकीय स्थितीचा योग्य अभ्यास करून ते दिले जाणे अनिवार्य आहे. या इंजेक्शनच्या वितरणामध्ये कागदोपत्री पूर्तता करण्यासाठी वेळ जाऊ नये व औषध रूग्णालयाला अतीतातडीने उपलब्ध होण्यासाठी तीन भागातील सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

यामध्ये नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रासाठी वैद्यकीय आरोग्य अधिकारी, नाशिक, नाशिक ग्रामीण कार्यक्षेत्रासाठी जिल्हा शल्य चिकित्सक आणि मालेगांव महानगरपालिका कार्यक्षेत्रासाठी मालेगांव महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे, असेही जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.वरील तिन्ही भागातून त्यांचेकडे प्राप्त होणारी मागणी तसेच रुग्णांच्या स्थितीचा विचार करून संबंधित सक्षम वैद्यकीय अधिकारी यांनी शासनाने याबाबत ठरवून दिलेल्या मापदंडाप्रमाणे संबंधित रुग्णालयांना या इंजेक्शनचे तातडीने वितरण करावे.

टोसिलीझुमॅब इंजेक्शन वितरणाची कार्यपद्धतीबाबत त्यांचे कार्यक्षेत्रातील सर्व कोविड रुग्णालयांना त्यांनी अवगत करावे तसेच निश्चित केलेल्या ट्रिटमेंट प्रोटोकॉलनुसार रुग्णाला या औषधाची खरोखरी गरज असल्याबाबत पडताळणी होणे आवश्यक असल्याने ठरवून दिलेल्या नमुन्यात रुग्णालयांकडून येणारी मागणी नोंदवून घेण्यासाठी त्याच स्तरावर स्वीकृतीची योग्य ती व्यवस्था नेमून दिलेल्या सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तयार करण्याच्या सूचना, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिल्या.

43 टोसिलीझुमॅब इंजेक्शनचे वाटप

नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 55 टक्के सक्रिय रुग्णांचे प्रमाण असून एकूण 23 टोसिलीझुमॅब इंजेक्शनचे वाटप करायचे होते. त्यामध्ये विजय फार्मा 5, कुणाल एजन्सी 3, मे. चौधरी आणि कंपनी 5, हॉस्पी केअर एजन्सी 10 असे एकूण 23 टोसिलीझुमॅब इंजेक्शनचा पुरवठा करण्यात आला.

नाशिक ग्रामीण क्षेत्रात एकूण 40 टक्के सक्रिय रुग्णांचे प्रमाण असून एकूण 18 टोसिलीझुमॅब इंजेक्शनचे वाटप करावयाचे होते त्यामध्ये महावीर फार्मा 2, सह्याद्री डिस्ट्रीब्युटर्स 2, रुद्राक्ष फार्मा 5, पुनम एन्टरप्रायझेस 5, स्वामी समर्थ एन्टरप्रायझेस 4 असे एकूण 18 टोसिलीझुमॅब इंजेक्शनचा पुरवठा करण्यात आला आहे.

मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात 5 टक्के सक्रिय रुग्णांचे प्रमाण असून एकूण 2 टोसिलीझुमॅब इंजेक्शनचे वाटप करायचे होते. त्यामध्ये ब्रह्यगिरी एन्टरप्रायजेसने 2 टोसिलीझुमॅब इंजेक्शनचा पुरवठा केला असून जिल्ह्यात एकूण 20 टोसिलीझुमॅब इंजेक्शनचा पुरवठा करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com