नाशिक । प्रतिनिधी Nashik

दक्षिण गंगा अशी ओळख असलेल्या गोदावरिचे उगमस्थान असलेल्या त्र्यंबकेश्वर येथील डोंगरांचे खाण माफियांकडून अवैधरित्या उत्खनन सुरु आहे. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर प्रशासनाने त्र्यंबकेश्वरच्या तहसीलदारांनी नोटीसही बजावली आहे. शिवाय डोंगरांचे रक्षणासाठी निवडणूक तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील पथकाची स्वतंत्रपणे नियुक्ती करुन पाहाणीही केली आहे.

ब्रह्मगिरीच्या पलीकडील बाजूने सर्रासपणे अवैध उत्खनन सुरु असल्याचे महसूल विभागाच्या निदर्शनास आले आहे. त्यावर तहीसलादारांनी 8 लाख रुपयांची दंडाची नोटीसही बजावली आहे. पण अवैध उत्खनन सुरु असताना अन् ऐतिहासिक महत्व असलेल्या या डोंगररांगांनाच फोडण्याचे अन् त्यातून आपले खिसे भरण्याचे काम केले जात असताना केवळ दंडात्मक नोटीस देण्यातच तहसीलदारांनी धन्यता मानली आहे. त्यामुळे संबधित स्टोन क्रशरधारकांना शिक्षा होणे अपेक्षित असतानाही त्यादृष्टीने पावले उचलली जात नसल्याचे थेट अपर जिल्हाधिकार्यांनीच यासाठी निवडणूक शाखेचे तहसीलदार प्रशांत पाटील यांच्याकडे हे प्रकरण सोपविले.

स्वतंत्र पथकांची स्थापणा करत त्यांना स्थळ निरीक्षणासाठीही धाडले आहे. त्यांनीही तेथील परिस्थिती अत्यंत विदारक आणि भयानक असल्याचा सांगितले असून, लवकरच वरीष्ठांना लेखी अहवाल सादर केला जाणार असल्याचे सांगितले. दरम्यान अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांनीही अवैध उत्खनन करणार्यांवर कठोर कारवाई केली जाईल. कुणालाही यातून सोडणार नसून, जिल्ह्यातील इतर ठिकाणीही सुरु असलेल्या प्रकारांना आळा घालण्यासाठी भरारी पथकांची स्थापणाही केली आहे.