जि.प.तर्फे अनुकंपा वारसांना नियुक्तीपत्र

जि.प.तर्फे अनुकंपा वारसांना नियुक्तीपत्र

नाशिक । Nashik

जिल्हा परिषदेने शासकीय नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या अनुकंपा वारसांना सेवेत सामावून घेण्यात आले.

सामान्य प्रशासनाने अनुकंपा अंतर्गत परिचर, आरोग्य सहाय्यक, अभियंता, शिक्षणसेवक, मुख्यसेविका, पशुधन पर्यवेक्षक आदी पदांवर या पाल्यांना नियुक्तीचे आदेश दिले. यात आरोग्य विभागात अनेक नियुक्त्या मिळाल्या. या नियुक्तीमुळे रिक्त पदाचा भार काहीसा कमी झाला आहे.

पाच ते सहा वर्षांपासून ही प्रक्रीया रखडली होती. मात्र, उप मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे, रवींद्र परदेशी यांनी पाठपुरावा करून, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या नेतृत्वाखाली ही प्रक्रीया पार पाडली.

अनुकंपा तत्त्वावर नोकरीत सामावून घेण्यासाठी पात्र उमेदवार वषार्नुवर्षे उंबरठे झिजवत होते, काही उमेदवारांचे सेवेत सहभागी होण्याचे वय देखील संपुष्टात येण्याची भीती व्यक्त केली जात होते. अशातच जि.प. प्रशासनाने अनुकंपा तत्त्वासाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, वय, जातीचे प्रमाणपत्र, आवश्यक कागदपत्रे यांची छाननी करून प्रतीक्षा यादी तयार केली होती.

याच दरम्यान राज्य शासनाने १० टक्के भरतीचे आदेश काढल्याने प्रशासन संभ्रमात पडले. मात्र, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पिंगळे यांनी सुमारे ६७ उमेदवारांना जि.प.च्या सेवेत सामावून घेतले, त्यात प्रामुख्याने उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार रिक्त जागी व पदांवर नेमणूक केली.

या प्रक्रीयेत प्रतीक्षेत असलेले २०० हून अधिक उमेदवारांकडून होत असलेला पाठपुरावा पाहता, पुन्हा अनुकंपा तत्त्वावर भरती करण्याचा निर्णय झाला. नवीन इमारतीतील सभागृहात ही प्रक्रीया राबविण्यात आली. यात कृषी विस्तार अधिकारी १, कनिष्ठ अभियंता २, स्थापत्या अभियंता सहाय्यक ५, पशुधन पर्यवेक्षक २, प्रयोग शाळा तंत्रज्ञ १, आरोग्य सेविका १, आरोग्य सेवक २८, पर्यवेक्षिका १, शिक्षक सेवक १२, प्राथमिक आरोग्य केंद्र परिचर ४०, पशु वैद्यकिय दवाखा परिचर ३, पंचायत समिती परिचर २, मुख्यालय परिचर १ व १९ ग्रामसेवक यांना नियुक्त पत्र यावेळी देण्यात आले.

जिल्हा परिषदेच्या रिक्त जागा भरल्या जाऊन सेवकांचा अतिरिक्त ताण कमी होण्यास मदत होईल. सामान्य प्रशासन विभागाचे कनिष्ठ प्रशासन अधिकारी रणजित पगारे, निवृत्ती बागड, मंगेश केदार, किशोर पवार, प्रकाश थेटे, पंडितराव कटारे यांनी यासाठी सहकार्य केले. या नियुक्त्यांचे कर्मचारी युनियनच्या सर्व संवर्गीय संघटनेने स्वागत केले आहे.

६९ परिचरांच्या विनंतीने बदल्या

जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागांतर्गत ६९ परिचरांच्या विनंतीने बदल्या करण्यात आल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे यांनी दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com