नाशिक । प्रतिनिधी

ग्रामपंचायत निवडणुकीचा अर्ज छाननीच्या दिवशी गुरुवारी (दि.३१) पाच तालुक्यातील शंभरहून अधिक उमेदवारांचे अर्ज बाद झाले. नाशिक तालुक्यात २९ तर बागलाण तालुक्यात ३० उमेदवारांचे अर्ज बाद झाले.इतर तालुक्यात रात्री उशीरापर्यंत छाननीचे काम सुरु होते. त्यामुळे बाद उमेदवारांची संख्या वाढण्याची चिन्हे आहेत.

राज्यासह जिल्ह्यात ग्राम पंचायत निवडणुकीचा फिव्हर असून ऐन थंडित राजकीय वातावरण तापले आहे. जिल्ह्यात १३ तालुक्यातील ६२१ ग्रामपंचायतींसाठी तब्बल १६ हजार ९९३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. मागील २३ ते ३० डिसेंबर या कालावधीत अर्ज दाखल करण्याची मुदत होती. गुरुवारी अर्ज छाननी प्रक्रिया सुरु झाली. रात्री हाती आलेल्या माहितीनूसार पाच तालुक्यातील शंभर उमेदवारांचे अर्ज कागद पत्रांची अपूर्तता व तांत्रिक अडचणीमुळे बाद ठरले.

त्यामध्ये येवला १३, दिंडोरी १७, बागलाण ३०, नाशिक २९ व देवळ्यात एका उमेदवाराचा अर्ज बाद झाला. तर त्र्यंबकेश्वर व इगतपुरी तालुक्यात सर्व उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहे.सिन्नर, कळवण, निफाड, चांदवड, मालेगाव, नांदगाव या तालुक्यातील अर्ज छाननीचे काम रात्री उशीरापर्यंत सुरु असल्याने वैध व अवैधची आकडेवारी उपलब्ध होऊ शकली नाही.

दरम्यान, चार जानेवारीला अर्ज माघारी मुदत असून याच दिवशी चिन्ह वाटप होणार आहे. त्यापुर्वीच अनेक ठिकाणी ग्राम पंचायत बिनविरोध करण्यासाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत. अनेक ठिकाणी कोटयवधीच्या बोली लावल्या जात असून उमराणे ग्रामपंचायतीसाठी लावण्यात आलेली अडिच कोटिचि बोली राज्यभर चर्चैचा विषय ठरली. माघारीनंतरच चित्र स्पष्ट होणार असले तरी ६२१ जागासांठी हजारो उमेदवारांनी केलेले उमेदवारी अर्ज बघता जोरदार धुराडा उडणार आहे.

अर्ज बाद स्थिती

तालुका उमेदवारी अर्ज बाद

येवला १७८६ १३

इगतपुरी १४७ ०

दिंडोरी १३०१ १७

त्र्यंबकेश्वर ५० ०

बागलाण १३३५ ३०

देवळा ३३९ १

नाशिक ७७२ २९