प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
नाशिक

प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

३१ जुलै पर्यंत अर्ज करण्याचे जिल्हा कृषी अधिक्षकांचे आवाहन

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी

प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या खरीप हंगाम २०२० साठी अधिकाधिक शेतकऱ्यांनी ३१ जुलै २०२० पर्यंत अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नाशिक एस.जी.पडवळ यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनासाठी २९ जुन २०२० च्या शासन निर्णयानुसार २०२०-२१ ते २०२२-२३ या तीन वर्षासाठी एकच शासन निर्णय लागू करण्यात आला आहे. या तीन वर्षांच्या कालावधीत खरीप व रब्बी हंगामातील पिकांकरीता नाशिक जिल्ह्यासाठी भारती अॅक्सा जनरल इन्शुरन्स कंपनी ही

एकच विमा कंपनी नेमण्यात आली आहे. जिल्ह्यातील जवळपास सर्वच प्रमुख अन्नधान्य, गळीत धान्यआणि नगदी पिकांचा समावेश या योजनेत करण्यात आला असून, रब्बी हंगाम २०२०-२०२१ साठी पुढील पिकांकरीता रब्बी ज्वारी ३० नोव्हेंबर २०२० तसेच गहू बा., हरभरा, कांदा व इतर पिके १५ डिसेंबर २०२० पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे.

सदर पीकविमा योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी तात्काळ नजीकच्या कृषी सहाय्यक, कृषी परिवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाशी व नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्राशी किंवा बँकेशी संपर्क करावा. तसेच संबंधित बँकेत प्रस्ताव सादर करतांना सर्व बिगर कर्जदार व कर्जदार शेतकऱ्यांनी आपले फोटो असलेले आधारकार्ड जोडलेल्या बँक खातेपुस्तकाची प्रत, पिक पेरणी स्वयंघोषणा पत्र, तसेच आधारकार्ड छायांकित प्रत सादर करणे आवश्यक आहे.

सदर योजनेअंतर्गत खरीप हंगामात भात, खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी, मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग, सोयाबीन, कारळे, कापूस, खरीप कांदा या पिकांचा तर रब्बी हंगामात गहू बा, ज्वारी बाजरी ,, हरभरा, उन्हाळी भुईमूग, रब्बी कांदा या पिकांचा समावेश करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांच्या विमा हप्त्याचा भार कमी व्हावा यासाठी, खरीप हंगामासाठी विमा हप्ता २ टक्के, रब्बी हंगामासाठी १.५ तर नगदी पिकांसाठी ५ टक्के असणार आहे. कर्जदार किंवा बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी ही योजना ऐच्छिक असून, कर्जदार शेतकऱ्यांनी संबंधित

बँकेस किंवा पतपुरवठा करणाऱ्या संस्थेस कळविणे बंधनकारक असल्याचे प्रसिध्दी पत्रकात नमुद करण्यात आले आहे.

पिक विमा योजनेअंतर्गत पिक पेरणीपासून ते काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, चक्रीवादळ, पूर, दुष्काळ, भुसाखलन, पावसातील खंड, कीड व रोग इत्यादी बाबींमुळे पिकांच्या उत्पादनात येणारी घट जोखमीच्या बाबींमध्ये सामाविष्ट केलेली आहे. हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्तितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान (फक्त खरीप हंगामासाठी) पिकांची काढणीपश्चात होणारे नुकसान तसेच स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानासाठी ही पीक विम्याचे संरक्षण मिळणार आहे, असे प्रसिध्दी पत्रकातुन कळविण्यात आले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com