नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक महानगरपालिकेवर सेनेची स्वबळावर सत्ता यावी असे स्वप्न शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बघितले असून त्यासाठी शिवसैनिकांनी आतापासूनच सज्ज होऊन महापालिकेवर सेनेचा भगवा फडकवा, असे आवाहन संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी नाशिक दौर्यात केले.

नाशिक येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालय शालिमार येथे आयोजीत पदाधिकारी, नगरसेवक आणि अंगीकृत संघटनांचे प्रमुख आणि शिवसैनिकांच्या बैठकीत चौधरी बोलत होते. या बैठकीत चौधरी यांनी उपस्थितांसोबत चर्चा करून आगामी महापालिका निवडणुकीबाबत त्यांच्या सूचना आणि समस्या जाणून घेतल्या. महाराष्ट्रात शिवसेना -काँग्रेस - राष्ट्रवादीचे महा विकास आघाडी सरकारचे कामकाज उत्कृष्टरित्या सुरू आहे. परंतु भारतीय जनता पार्टीतर्फे नानाविध आरोप करून जनतेमध्ये या सरकारबद्दल गैरसमज पासरविण्याचा एक कलमी कार्यक्रम सुरू आहे. त्यांचा हा डाव उधळून लावण्यासाठी शिवसैनिकांनी आत्तापासूनच कंबर कसली पाहिजे.

आगामी महानगरपालिका निवडणुका म्हणजे या सरकारची खरी कसोटीचआहे.या निवडणुका एकत्रित की स्वतंत्रपणे लढायच्या याबाबतचा निर्णय त्या त्या पक्षांचे प्रमुख संयुक्तरित्या घेतीलच.परंतु आपल्याला स्वबळाची तयारीसुद्धा ठेवावीच लागणार असल्याने शिवसैनिकांनी गाफील न राहता नाशिक महापालिकेवर सत्ता काबीज करण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावावे, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी नगरसेवक, पदाधिकारी आणि आणि शिवसैनिकांनी मौलिक सूचना केल्या व समस्यांही मांडल्यात. यात शिवसेनेला सद्या अनुकूल वातावरण असल्याने स्वबळावरच निवडणुका लढाव्यात, एक किंवा दोन वार्डाचा मस्तदारसंघ हवा,उमेदवारी देतांना निष्ठावंत हा निकष ठेवावा,ऐनवेळी पक्षात येणार्यांना उमेदवारी देण्यात येऊ नये, महामंडळे आणि जिल्हा समित्यांच्या नियुक्त्या लवकर जाहीर कराव्यात, निष्क्रिय पदाधिकार्यांना त्वरित हटवून त्यांच्याऐवजी कार्य करणार्या लोकांना संधी द्यावी आदी सूचना केल्या. यानंतर पक्षप्रमुखांशी चर्चा करून त्याचे निरसन करण्याचे आश्वासन चौधरी यांनी उपस्थितांना दिले.

याप्रसंगी शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, शिवसेना जिल्हा प्रमुख सुनील पाटील, वसंत गीते, सत्यभामा गाडेकर, ललित शाईवाले, राहुल ताजनपुरे, वैभव ठाकरे, सचिन मराठे, प्रकाश मस्के, मंगलाताई भास्कर, शोभाताई मगर यांच्यासह पदाधिकारी - शिवसैनिक उपस्थित होते.