वनराई बंधारे बांधण्यासाठी श्रमदानाचे आवाहन

मनिषा महाले - सुरगाणा पंचायत समिती सभापती
वनराई बंधारे बांधण्यासाठी श्रमदानाचे आवाहन

ठाणगाव । वार्ताहर Thangaon

सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, पेठ तालुक्यात जलपरिषदेने ‘ मिशन जलपरिषद 101 वनराई बंधारा’ मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत ग्रामस्थ उत्स्फूर्तपणे श्रमदानात सहभागी होत वनराई बंधारे बांधण्यात येत आहेत. ही मोहीम श्रमदानासाठी कौतुकास्पद आहे’, असे प्रतिपादन सुरगाणा पंचायत समितीच्या सभापती मनिषा महाले यांनी केले आहे.

सुरगाणा तालुक्यातील कहांडचोंड येथे जलपरिषद तसेच ग्रामस्थांच्या श्रमदानातून वनराई बंधार्‍यांची निर्मिती करण्यात आली आहे. त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात मनिषा महाले बोलत होत्या. मनिषा महाले पुढे म्हणाल्या की, ना स्वार्थासाठी, ना राजकारणासाठी फक्त एक पाण्यासाठी..! हे ब्रीद वाक्य घेऊन जलपरिषद ग्रामस्थांच्या पुढाकारातुन वनराई बंधार्‍यांची निर्मिती करत आहे.

या मोहिमेत सुरगाणा तालुका ही पाण्याच्या श्रमदानासाठी योगदान देत असून वनराई बंधार्‍याची निर्मिती करत आहे. यामुळे गट -तट बाजूला सारून केवळ पाण्यासाठी आणि पाण्याच्या श्रमदानासाठी योगदान द्यावे. उन्हाळ्यात भेडसावणारी पाणीटंचाई आणि महिलांसह पुरुषांना ही पाण्याच्या शोधासाठी करण्यात येत असलेली भटकंती दाहीदिशा आणि उग्ररूप धारण करणारी आहे.

पंचायत समितीच्या माध्यमातून तात्पुरत्या स्वरूपात ट्रॅकरद्वारे पाणीटंचाई गावांना जरी पाणीपुरवठा करण्यात येत असेल तरीही पाण्याचे महत्व ग्रामस्थांनी जाणून घायला हवे. सुरगाणा तालुक्याला निसर्गाने भरभरून निसर्ग सौंदर्याची देण दिली आहे.यामुळे भिवतास धबधबा महाराष्ट्र - गुजरात तसेच अन्य ठिकाणाच्या कानाकोपर्‍यात नावारूपास पोहचला असून पर्यटक येथे मोठ्या प्रमाणावर भेट देत आहेत.

यामुळे निसर्गाच्या सानिध्याच्या कुशीत सुरगाणा तालुका पावसाच्या चारही महिने डोंगर दर्‍यातून खळाळून वाहतो आहे.मात्र उन्हाळ्यात पाणीटंचाई ने होरपळून ही निघतो आहे ही येथील मोठी शोकांतिका आहे. पावसाच्या माहेघरी पाणीटंचाईच्या झळा ग्रामस्थांना सोसाव्या लागत असल्याने मिशन जलपरिषद वनराई बंधारे पुढील काळात उपयुक्त ठरणारे आहेत.

यासाठी ग्रामस्थांनी हिरारीने पुढाकार घेऊन केवळ पाण्यासाठी श्रमदानाने योगदान द्यावे असे आवाहन सभापती मनिषा महाले यांनी केले आहे. यावेळी मोतीराम गावीत,योगेश महाले, नारायण टोपले, प्रभाबाई गावीत, चिंतामण गावीत, हौसा गावीत, मोहन गावीत हरीश गावीत आदींसह जलमित्र उपस्थित होते.

ठाणगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणार्‍या कहांडळचोंड येथील कुंडाचा नाला ओहळावर जलमित्र तसेच आम्ही वनराई बंधार्‍यासाठी श्रमदान करून बांधला आहे.यामुळे शेती,जनावरे यांचा जवळपास एप्रिल- मे अखेर पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.

चिंतामण गावीत, ग्रामस्थ- कहांडळचोंड

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com