करोनाचे नियम पाळून जिल्ह्यातील बाजार समित्या सुरू करा

करोनाचे नियम पाळून जिल्ह्यातील बाजार समित्या सुरू करा

चिंचखेड | वार्ताहर

नाशिक जिल्ह्यामध्ये आजपासून पुढील 23 मे पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आलेला आहे. याकाळात बाजार समित्या बंद ठेवण्याचा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे. नाशिक जिल्हा मोठया प्रमाणात भाजीपाला व कांदा उत्पादक जिल्हा असल्यामुळे जर अकरा दिवस बाजार समित्या बंद राहिल्या तर शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होईल.

यामुळे कठोर निर्बंध घालून का होईना पण बाजार समित्या सुरू कराव्यात. अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली आहे.

भाजीपाला नाशवंत असतो तो खराब होईल. मान्सून डोक्यावर आल्यामुळे व अवकाळी पाऊस सतत पडत असल्यामुळे वावरात कांदा जास्त दिवस शेतकऱ्यांना ठेवणं शक्य नाही.

बाजारसमित्या पुन्हा अकरा दिवसांनी सुरू झाल्यावर आवक वाढून कांद्याचे भाव पडण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी भरडले जातील. म्हणून कठोर नियम पाळून मार्केट सुरू करावे.

हवे तर त्याला पर्यायी व्यवस्था निर्माण करावी. शहराच्या बाहेर खुल्या मैदानात बाजार भरवावा. कांदा लिलावा वेळी सुद्धा बाजार समितीती गर्दी होत असेल तर पर्यायी जागेत सुद्धा लिलाव करावे .असे या पत्रात सुचवण्यात आले आहे.

नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीच्या जवळच्या कोणाचा तरी कोरोनाने बळी घेतला आहे. त्यामुळे या जीवघेण्या आजाराची साखळी तुटणे गरजेचे आहेच.स्वाभिमानी शेतकरी संघटना खांद्याला खांदा लावून प्रशासनासोबत उभी आहे.

परंतु संपूर्ण मार्केट बंद ठेवले तर कोरोना पेक्षा बिकट परिस्थिती शेतकऱ्यांची होईल. या विषयावर आंदोलन करण्याची ही वेळ नाही. म्हणून आम्ही बाजार समिती सुरू करण्याची कळकळीची विनंती प्रशासनास करत आहोत असे जगताप म्हणाले.

नाशिक जिल्ह्यात करोनाने थैमान घातला आहे. त्या मुळे प्रशासनाने जे पाऊलं उचलले त्याचे आम्ही अंशतः स्वागत करतो. परंतु बाजार समित्या पूर्ण बंद ठेवल्या तर शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होईल. विशेषतः भाजीपाला व कांदा उत्पादक देशोधडीला लागतील. म्हणून कडक नियम करून व पर्यायी व्यवस्थेचा आधार घेऊन बाजार समित्या तात्काळ सुरू कराव्या. शेतकरी निश्चित सर्व नियम पाळतील व प्रशासन, बाजार समितीला सहकार्य करतील याची मला खात्री आहे. तसेच 11 दिवसानंतर अचानक बाजार समितीत गर्दी वाढून कोरोना वाढीचा धोकाही टाळता येईल.

संदीप जगताप प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com