बाजार समिती निवडणूक : मतदानाबाबत संभ्रम

मतदार गटात शेतकर्‍यांचा समावेश नाही
बाजार समिती निवडणूक : मतदानाबाबत संभ्रम

नाशिक । प्रतिनिधी Nashik

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेवर आल्यानंतर बाजार समिती संचालक मंडळाच्या निवडणुकीत (election of the Board of Directors of the Market Committee)शेतकर्‍यांना मतदानाचा अधिकार देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

याची अंमलबजावणी येणार्‍या बाजार समितीच्या निवडणुकांच्यावेळी होईल, असे चित्र होते.प्रत्येक शेतकर्‍याला मतदानाचा अधिकार प्राप्त होणार या आशेने शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण होते. मात्र, मंगळवारी (दि.6) राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यात शेतकर्‍यांना मतदान करण्याबाबतचा उल्लेख कोठेही नाही. त्यामुळे शेतकर्‍यांना मतदानाचा अधिकार मिळणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

राज्यात सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांमध्ये सर्व सभासद शेतकर्‍यांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने ऑगस्ट 2017 मध्ये घेतला होता. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारने तो निर्णय जानेवारी 2020 मध्ये बदलला. त्यानंतर निवडणुका पूर्वीप्रमाणेच होतील, असेही जाहीर करण्यात आले. त्यानंतर आता शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आले आहे. त्यांनी महाविकास आघाडी सरकारचा निर्णय बदलून पुन्हा बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकर्‍यांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने बाजार समित्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामध्ये शेतकर्‍यांच्या मतदानाच्या निर्णयाचा उल्लेख कुठेही नाही. त्यामध्ये बाजार क्षेत्रातील कार्यरत प्राथमिक कृषी पतसंस्था, बहुउद्देशीय सहकारी संस्था, ग्रामपंचायतीचे सदस्य, परवाना धारक व्यापारी, अडते आणि हमाल, तोलाईदार यांनाच फक्त बाजार समितीचे मतदार म्हणून त्यांच्या याद्या जमा करण्यास संबंधित विभागाला आदेश देण्यात आले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com