
लासलगाव / येवला | Lasalgaon / Yeola
नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी कांदा व्यापाऱ्यांनी दि. 20 पासून बेमुदत बंद पुकारल्याने नाशिक जिल्ह्यातील 17 बाजार समित्या आणि उपबाजार आवारात दुसऱ्या दिवशी शुकशुकाट दिसून आला...
लिलाव बंदच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत संचालक मंडळ व व्यापाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी बाजार समितीचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपसभापती गणेश डोमाडे, जयदत्त होळकर, भीमराज काळे, संदीप दरेकर, छबुराव जाधव, डॉ. श्रीकांत आवारे, तानाजी आंधळे, डी. के. जगताप, महेश पठाडे, राजेंद्र बोरगुडे, बाळासाहेब दराडे, रमेश पालवे, माजी संचालक नंदकुमार डागा, सचिव नरेंद्र वाढवणे आदी उपस्थित होते.
या बैठकीस व्यापारी वर्गाकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने आणि व्यापारी बंदच्या भूमिकेवर ठाम असल्यामुळे काही निर्णय न झाल्यामुळे व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्णय घेण्यात आला.
काय कारवाई होणार?
जिल्हा उपनिबंधकांकडून आलेल्या आदेशनुसार व्यापाऱ्यांना नोटीस देऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी सांगितले. बाजार समितीत एकूण 131 परवानाधारक व्यापारी आहे. लिलावात सहभागी न झाल्यास सर्वांवर कारवाई करण्यात येणार आहे.
काल २५ व्यापाऱ्यांनी परवाने बाजार समितीच्या मुख्य कार्यालयात जमा केले आहे. त्यांची पुढील काय भूमिका आहे? यावरून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, तसेच आज दुसऱ्या दिवशीही नाशिक जिल्ह्यातील सर्व 17 बाजार समिती आणि उपबाजार समितीत कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांनीही कांदा विक्रीस न आणल्याने बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळत आहे. दोन दिवसापासून कांद्याची उलाढाल ठप्प झाल्याने ५० कोटीहून अधिकची उलाढाल ठप्प झाली आहे.
येवला बाजार समितीतही व्यवहार ठप्प
नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमधील लिलाव बेमुदत बंद केलेले आहे. त्यामुळे परिणामी येवला कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यवहार ठप्प असल्याने शेतकर्यांची कांदा विक्रीसाठी तारांबळ होत आहे.
सोमवारी बाजार समिती आवारात झालेल्या लिलावात सकाळच्या सत्रात 450 व दुपारच्या सत्रात 348 असे एकूण 798 नगांची आवक झाली होती. यावेळी कांद्याला किमान 551 रुपये तर कमाल 2212 रुपये असा बाजारभाव देण्यात आला. 1750 अशी सरासरी काढण्यात आली. दि.19 रोजी गणेश चतुर्थीनिमित्त बाजार समिती बंद असल्याने आवारात शांततामय वातावरण होते.
येवला येथे पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला असता व्यापार्यांनी अशा पद्धतीने अचानक लिलाव बंद करुन शेतकर्यांना अडचणीत आणून वेठीस धरणं योग्य नाही. त्यांनी आठ ते दहा दिवस अगोदर आमच्या विभागाकडे सूचना मांडली होती. त्यानुसार येत्या 26 तारखेला चर्चा करण्यात येणार होती. परंतु, त्यांनी सणासुदीच्या काळात बंद पुकारुन शेतकर्यांना अडचणीत आणले आहे.
त्यामुळे सहकार आयुक्त व पणनचे आयुक्त हे विचारविनिमय करुन जिल्हाधिकारी नाशिक यांच्यामार्फत व्यापार्यांवर कारवाई करण्यात येईल, असे मंत्री सत्तार यांनी सांगितले. उद्या नाशिक जिल्हा स्तरावरील व्यापारी असोसिएशनची बैठक होणार असून या बैठकीत बंद प्रश्नावर तोडगा निघाल्यास लिलाव सुरु होण्याची शक्यता असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजले आहे.