पालकांच्या लेखी संमतीनेच विद्यार्थ्यांचे शाळा प्रवेश

वाचा मार्गदर्शक सूचना
पालकांच्या लेखी संमतीनेच विद्यार्थ्यांचे शाळा प्रवेश

नाशिक | Nashik

एकीकडे कराेना संकटाचा सामना करताना दुसरीकडे २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत.

या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करण्यापूर्वी व शाळा सुरू झाल्यानंतर आरोग्य, स्वच्छता व इतर सुरक्षाविषयक उपाययोजनांबाबत राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

यामध्ये खुल्या मैदानात वर्ग घेण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत त्यांच्या पालकांची लेखी संमती आवश्यक असणार आहे.

विद्यार्थ्यांना एक दिवस आड शाळेत बोलवण्यात येणार असून, उर्वरित ५० टक्के विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्यात येणार आहे. आजारी असलेल्या मुलांना पालकांनी शाळेत पाठवू नये, अशा सूचना शालेय शिक्षण विभागाकडून जारी करण्यात आल्या आहेत.

शाळा सुरू करण्यापूर्वी शाळेची स्वच्छता, निर्जंतुकीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

शाळेत हात धुण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देणे, थर्मोमीटर, थर्मल स्कॅनर, पल्स ऑक्सिमीटर, जंतुनाशक,साबण, पाणी इत्यादी आवश्यक वस्तूंची उपलब्धता तसेच शाळेची स्वच्छता व निर्जंतुकीकरण याबाबत स्थानिक प्रशासनाने सुनिश्चित करावी, असा यात म्हटले आहे. वाहतूक सुविधांचे निर्जंतुकीकरण करावे, क्वारंटाइन सेंटर अन्यत्र नेणे शक्य नसल्यास शाळा खुल्या परिसरात किंवा इतर ठिकाणी भरवावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना १७ ते २२ नोव्हेंबरदरम्यान कराेनासाठीची आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक असेल.

या चाचणीचे प्रयोगशाळेने दिलेले प्रमाणपत्र शाळा व्यवस्थापनास सादर करायचे आहे. वर्गखोली तसेच स्टाफरूममधील बैठक व्यवस्था शारीरिक अंतराच्या नियमानुसार असावी, वर्गामध्ये एका बाकावर एक विद्यार्थी याप्रमाणे नावानिशी बैठक व्यवस्था असावी.

शाळेत दर्शनी भागावर शारीरिक अंतर, मास्कचा वापर इत्यादी संदर्भात मार्गदर्शक सूचना असाव्यात, थुंकण्यावरील बंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, पाणी पिण्याच्या सुविधा, हात धुण्याच्या सुविधा, स्वच्छतागृहे यांसारख्या गर्दी होणाऱ्या ठिकाणी ही व्यवस्था करावी

इतर महत्त्वाच्या सूचना

- शाळा व्यवस्थापन समितीने शाळेतील गर्दी टाळण्यासाठी एक दिवसाआड विद्यार्थ्यांना शाळेत बोलवावे. एका दिवशी ५० टक्के विद्यार्थी ऑनलाइन वर्गात व उर्वरित ५० टक्के विद्यार्थी प्रत्यक्ष वर्गात उपस्थित राहतील.

- प्रत्यक्ष वर्गाचा कालावधी तीन ते चार तासांपेक्षा अधिक असू नये. प्रत्यक्ष वर्गांसाठी जेवणाची सुट्टी असेल.

- विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी त्यांच्या पालकांची लेखी संमती आवश्यक असेल.

- शाळा व्यवस्थापन समितीने पालकांशी चर्चा करावी.

- विद्यार्थी मास्कची अदलाबदल करणार नाहीत, याची दक्षता शिक्षकांनी घ्यावी.

- विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त अन्य कोणालाही शाळेच्या आवारात प्रवेश देऊ नये.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com