'त्या' अ‍ॅपमुळे अंगणवाडी सेविकांनी मोबाईल केले परत

'त्या' अ‍ॅपमुळे अंगणवाडी सेविकांनी मोबाईल केले परत

निफाड। प्रतिनिधी Niphad

अंगणवाडी सेविकांना (Anganwadi workers) देण्यात येणारे मोबाईल अतिशय निकृष्ठ असून ते सतत बिघडत आहेत. त्यामुळे आधीच या मोबाईलचे ओझे झाले असतांना त्यात आता डिजिटल इंडिया (Digital India) च्या नावाखाली पोषण ट्रॅकर (Nutrition tracker) हा नविन अ‍ॅप (Mobile App) दिल्याने अंगणवाडी सेविकांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

शासनाला वारंवार निवेदन देवूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने अखेर त्रस्त झालेल्या अंगणवाडी सेविकांनी आपल्या संघटनेच्या माध्यमातून पंचायत समितीच्या प्रकल्प अधिकार्‍यांकडे मोबाईल परत देत निषेध (Protest)नोंदवला आहे.

नाशिक जिल्हा (Nashik District) सीटू सलग्न प्रणित अंगणवाडी सेविका संघटनेच्या (Anganwadi Sevika Sanghatana) वतीने पंचायत समितीच्या एकात्मिक बालविकास प्रकल्प (Child Development Project) अधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 2019 मध्ये शासनाने अंगणवाडी सेविकांना मोबाइल दिले होते.

परंतु हे मोबाईल कमी क्षमतेचे व निकृष्ठ असल्याने ते सतत बिघडत. त्यातच आता पोषण ट्रॅकर अ‍ॅप ची भर पडली आहे. अंगणवाडी सेविकांना इंग्रजी लिहिता, वाचता येत नसल्याने त्यांना तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे हे ट्रॅकर बंद करावे याबाबत शासनाला निवेदन दिले.

मात्र त्याची दखल न घेतल्याने अखेरीस अंगणवाडी कर्मचारी (Anganwadi staff) संघटनेचे राज्य सचिव कॉम्रेड शुभा शमीम, नाशिक जिल्हा सीटू संघटना अध्यक्ष कॉ. सिताराम ठोंबरे, जिल्हा सचिव कॉ. कल्पना शिंदे यांच्या उपस्थितीत मोबाईल परत करण्यात आले.

या आंदोलनापूर्वी येथील ग्रामसंस्कार केंद्रात अंगणवाडी कर्मचारी मेळावा (Employee meet) संपन्न झाला. यात अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी सुलक्षणा ठोंबरे यांची निवड करण्यात आली.

अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर (Aasha Worker), शालेय पोषण आहार व इतर योजनेच्या कर्मचार्‍यांनी एकत्र येवून संघटनेची ताकद वाढवावी असे आवाहन यावेळी शुभा शमीम यांनी केले. यावेळी तालुका प्रमुख म्हणून सुनीता मोगल व सचिव म्हणून लता गावले यांची निवड करण्यात आली.

याप्रसंगी कॉ.राजेंद्र शिंदे, कॉ.बंडू बागूल, सरीता नांदुर्डीकर, ज्योती दिघे, अनिता वैद्य, सुरेखा पवार, अनिता रामराजे, श्रीमती. शिरसाठ, माया पगारे, प्रीतम डेंगळे, मनिषा जंगम, ललिता पंडीत, पुष्पा वाजे आदींसह अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com