अंगणवाडी सेविकांचा ट्रॅकर अ‍ॅपवर बहिष्कार

अंगणवाडी सेविकांचा ट्रॅकर अ‍ॅपवर बहिष्कार

लासलगाव । वार्ताहर

जिल्ह्यासह राज्यातील अंगणवाडी सेविकांनी मराठी अ‍ॅप येईपर्यंत इंग्रजी पोषण ट्रॅकर अ‍ॅपवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असल्याचे अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे प्रकल्प अधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे कळविले आहे.

निफाड तालुका अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात सुमारे 4 हजार अंगणवाडी सेविका कार्यरत आहेत. अंगणवाडी केंद्रातील दैनंदिन कामाकरिता अंगणवाडी सेविकांना शासनाकडून मोबाईल देण्यात आले आहेत. हे मोबाईल नित्कृष्ट दर्जाचे असल्याने शासनाने दिलेल्या मोबाईलमध्ये पोषण ट्रॅकर अ‍ॅप डाऊनलोड होत नाही. त्यामुळे जिल्हा व प्रकल्प कार्यालयाकडून अंगणवाडी सेविकांना व्यक्तीगत मोबाईलवर पोषण ट्रॅकर अ‍ॅप डाऊनलोड करण्याची सक्ती केली जात असून हे नैसर्गिक न्यायतत्वाला धरून नाही.

व्यक्तीगत मोबाईलवर शासनाने काम करण्याची सूचना देणे हे व्यक्तीगत अधिकाराने हनन करण्यासारखे आहे. जिल्ह्यातील अधिकांश अंगणवाडी सेविका अल्प शिक्षित असल्याकारणाने त्यांना इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान नाही. सध्या पोषण ट्रॅकर अ‍ॅपवर मुलांचे, महिलांचे नाव इंग्रजी भाषेत असल्याकारणाने इंग्रजी भाषेत भरण्यास अडचणी तयार होत आहेत. बहुतेक अंगणवाडी सेविका या मराठी भाषेतून शिक्षण घेतल्या कारणाने त्यांना इंग्रजी भाषेचे ज्ञान नसल्यामुळे अडचण निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.

निवेदनाप्रसंगी तालुक्यातील युनियन प्रतिनिधी लता क्षीरसागर, संगिता कासार, जया गरडे, संगीता मोरे, अर्चना कदम आदींसह तालुक्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस सोशल डिस्टन्स पाळत उपस्थित होत्या. आमच्या मागण्यांची दखल घेण्यासाठी निवेदन वरिष्ठांपर्यंत पाठविण्यात यावे अशी विनंती अंगणवाडी सेविकांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com