अंगणवाडी सेविकांचे 24 ला आंदोलन
USER

अंगणवाडी सेविकांचे 24 ला आंदोलन

निफाड। प्रतिनिधी Niphad

24 सप्टेंबर 2021 रोजी अखिल भारतीय पातळीवर कार्यरत असलेल्या कामगार संघटना संयुक्त कृती समितीने योजना कर्मचार्‍यांच्या मूलभूत मागण्यांसाठी देशव्यापी संप पुकारण्याचा निर्णय घेतला असून महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने (Maharashtra State Anganwadi Staff Action Committee) या संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याने जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका (Anganwadi worker), मिनी सेविका, मदतनीस या संपात सहभागी होणार असल्याचे अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या (Anganwadi Staff Union) जिल्हाध्यक्षा सुलक्षणा ठोंबरे यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे मार्गदर्शक शुभा शमीम, एम.ए. पाटील, दिलीप उटाणे, कमल परुळेकर, भगवान देशमुख यांच्या आवाहनानुसार या दिवशी आपल्या योजनेशी संबंधित कोणतेही प्रकारचे कामकाज करणार नाही. आपल्या संघटनेच्या वरिष्ठांनी राज्य तसेच केंद्र शासनाला तशी नोटीस दिली आहे.

हा संप इंटक, आयटक, एचएमएस, सीआयटीयु, एआययुटीयुसीयु, टीयुसीसी, एआयसीसीटीयु, एलपीएफ, युटीयुसी या सर्व केंद्रीय कामगार संघटनांनी पुकारलेला असून त्यात महाराष्ट्रातील महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती, महाराष्ट्र आशा व गटप्रवर्तक कृती समितीच्या (Maharashtra Asha and Group Promoter Action Committee) सर्व घटक, संघटना व वरील सर्व केंद्रीय कामगार संघटनांना संलग्न युनियन्स सहभागी होणार आहेत.

या संपात राष्ट्रीय आरोग्य अभियानातील मध्यान्ह भोजन कार्यक्रमातील शालेय पोषण आहार कामगार (School nutrition workers), मनरेगातील रोजगार सेवक, बालकामगार शिक्षण प्रकल्पांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, अंगणवाडी आहार पुरवठादार, बचत गट समन्वयक आदी केंद्र तसेच राज्य शासनाच्या योजनांमध्ये प्रत्यक्ष लाभार्थ्यांना तळागाळापर्यंत जावून सेवा देणार्‍यांचा योजना कर्मचार्‍यांमध्ये समावेश करण्यात आला आहे.

त्यामुळे 24 सप्टेंबर रोजी कोविडचे सर्व नियम पाळून जिल्हा व तालुका पातळीवर सर्व योजना कर्मचार्‍यांच्या सामूहिक कृती आयोजित कराव्या व त्यात सहभागी व्हावे असे आवाहन सुलक्षणा ठोंबरे यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com