अंगणवाडी सेविका भरती वयोमर्यादा वाढवावी

सभापती अश्विनी आहेर यांचीे मागणी
अंगणवाडी सेविका भरती वयोमर्यादा वाढवावी

नाशिक । प्रतिनिधी

अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका यांच्या भरती प्रक्रियेतील वयोमर्यादेची अट 21 ते 30 ऐवजी 21 ते 40 करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती आर्कि. अश्विनी आहेर यांनी महिला व बालकल्याणमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर यांच्याकडे केली आहे.

आदिवासी ग्रामीण भागात अनेक विधवा, परितक्त्या महिलांचे वयोमान 30 वर्षांपेक्षा जास्त असल्याचे आढळून आले आहे. 30 वर्षे वयोमर्यादाच्या अटी-शर्तीमुळे स्थानिक महिला सरळ सेवा भरतीच्या वेळी अपात्र होतात. व नोकरीच्या संधीपासून वंचित राहतात. वयोमर्यादेत वाढ करण्याबाबत ग्रामीण भागातील विधवा, परितक्त्या महिलांची मागणी आहे.

नाशिक जिल्ह्यात अंगणवाडी सेविका 241, मदतनीस 964, मिनी अंगणवाडी सेविका 23 अशी एकूण 1228 पदे रिक्त आहेत. नाशिक जिल्ह्यातसुद्धा अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबवण्याबाबत कार्यवाही प्रस्तावित आहे. सदर भरती प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी सरळ सेवा नियुक्तीच्या वयोमर्यादेमध्ये वाढ करावी, अशी मागणी आहे.

शासन आदेशातील अटी व शर्ती (क)मध्ये अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस पदावर सरळ सेवा नियुक्तीसाठी वयोमर्यादा 21 ते 30 वर्षे अशी आहे. त्याऐवजी सरळ सेवा नियुक्तीसाठी वयोमर्यादा 21 ते 40 वर्षे करण्याबाबत शासन निर्णयात सुधारणा करावी, असे निवेदन राज्याच्या महिला व बालविकासमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर यांना नाशिक भेटीप्रसंगी जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती आर्कि. अश्विनी आहेर यांनी दिले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com