शिक्षणाचे अपुरे स्वप्न पूर्ण करण्याची संधी; मुक्त विद्यापीठाचा निर्णय

शिक्षणाचे अपुरे स्वप्न पूर्ण करण्याची संधी; मुक्त विद्यापीठाचा निर्णय

नाशिक । प्रतिनिधी Nashik

2000 सालापासून मुक्त विद्यापीठात ( YCMOU )वेगवेगळ्या शिक्षणक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या आणि काही कारणांनी संबंधित मान्यताप्राप्त पदवी, पदविका, पदव्युत्तर पदवी अथवा प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण न करू शकलेल्या सुमारे साडेतीन लाख विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षणाचे अपुरे स्वप्न पूर्ण करण्याची एक अपूर्व संधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय मुक्त विद्यापीठाने घेतला आहे.

कुलसचिव डॉ. प्रकाश देशमुख यांनी याबाबत माहिती दिली. मुक्त विद्यापीठात स्थापनेच्या वर्षी 1989-90 या शैक्षणिक वर्षासाठी 3,750 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. मुक्त शिक्षणाला उदंड प्रतिसाद मिळत जाऊन आज ही प्रवेश संख्या पाच लाखांवर पोहोचली आहे. 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू असून आजमितीस सुमारे तीन लाखांचा टप्पा गाठला आहे. या वर्षीही मुक्त विद्यापीठाला अपूर्व असा प्रतिसाद मिळत आहे. पाच लाखांपेक्षा अधिक टप्पा याहीवर्षी गाठला जाईल, असा विश्वास डॉ. देशमुख यांनी व्यक्त केला.

मुक्त विद्यापीठात शिक्षणक्रम पूर्ण करण्यासाठी अनेक विद्यार्थी प्रवेश घेत असतात. अनेक कारणांनी काही विद्यार्थी तो शिक्षणक्रम विद्यापीठाच्या विहित मुदतीत पूर्ण करू शकत नाही. त्यांना लवकरच आवाहन करून, पत्र पाठवून त्यांचे अपुरे शिक्षण पूर्ण करण्याची संधी मुक्त विद्यापीठ लवकरच उपलब्ध करून देणार आहे. त्याबाबतची प्रक्रिया सुरू आहे. विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर याबाबतचे सविस्तर माहितीपत्रक उपलब्ध होईल, असे डॉ. देशमुख यांनी सांगितले.

विद्यापीठाचा अनोखा विक्रम

शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून अनेक कारणांनी बाजूला राहिलेल्या आणि शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या वंचितांसाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अविरत काम करत आहे. स्थापनेपासून गेल्या 33 वर्षांत विद्यापीठाने लाखो शिक्षण वंचित विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून एक अनोखा विक्रम प्रस्थापित केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com