मालेगाव । प्रतिनिधी

कुटूंबातील कर्ता व्यक्ती गेल्यानंतर संपूर्ण कुटूंब असाह्य होते. शहीद जवानांच्या कुटूंबियांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. अशावेळी या कुटूंबांच्या पुर्नवसनासाठी येथील महसुल प्रशासनातील अधिकारी व सेवकांनी सामाजिक बांधिलकी जपत केलेल्या आर्थिक मदतीचा उपक्रम प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी धनंजय निकम यांनी येथे बोलतांना केले.

तालुक्यातील मानके येथील शहीद जवान मनोराज सोनवणे यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने महसुल विभागाच्या अधिकारी, सेवकांनी एक दिवसाचे वेतन देण्याचा निर्णय घेतला होता.

1 लाख 29 हजार 883 रुपयांंचा निधी जमा झाल्याने त्याचा धनादेश अप्पर जिल्हाधिकारी धनंजय निकम यांच्या हस्ते वीर पत्नी जयश्री मनोराज सोनवणे यांना आज सुपूर्द करण्यात आला, या प्रसंगी निकम बोलत होते. प्रांत डॉ. विजयानंद शर्मा, तहसिलदार चंद्रजित राजपूत यांच्यासह अधिकारी व कर्मचारी व शहीद जवानाचे कुटुंबिय उपस्थित होते.

शहीद जवानाच्या कुटुंबास मदत करण्यासाठी खारीचा वाटा महसुल विभागाने उचलला आहे. तहसिलदार ते वाहन चालक अशा 94 अधिकारी, सेवकांनी जानेवारी महिन्यातील एक दिवसाच्या वेतनाची रक्कम स्वयंस्फुर्तीने दिली आहे. याचे अनुकरण इतर विभागांनी देखील करण्याचे आवाहन निकम यांनी यावेळी बोलतांना केले.

जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या कुटुंबीयांना विविध सामाजिक संस्थाच्यावतीने उभारी कार्यक्रमांतर्गत आगामी काळातही त्यांच्या अडीअडचणी समजून घेत त्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल.

तसेच शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल. कुटूंबातील सदस्यांच्या शिक्षणानुसार त्यांना रोजगार व स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी महसुल विभाग सदैव प्रयत्नशील असल्याचेही अप्पर जिल्हाधिकारी निकम यांनी शेवटी बोलतांना सांगितले.