नाशिक । प्रतिनिधी Nashik

शहरात दिवाळी सणाच्या निमित्ताने नाशिककरांनी खरेदीसाठी बाजारपेठेत केलेल्या गर्दीचे परिणाम जाणवू लागले असुन शहरातील प्रतिदिन नवीन करोना रुग्णांची अगोदर असलेली 134 प्रतिदिन सरासरी आता गेल्या आठवड्यात थेट 218 पर्यंत येऊन ठेपली आहे. या वाढत असलेल्या रुग्णांमुळे आता नाशिककरांची चिंता वाढविली असुन महापालिका यंत्रणा कामाला लागली आहे.

गेल्या आक्टोंबर महिन्यात नवीन करोना रुग्णांचे सरासरी प्रमाण शंभरच्या आत आले होते. यामुळे नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला होता. यानंतर नोव्हेंबर महिन्यातील पहिल्या दोन आठवड्यापर्यत नवीन रुग्णांचे प्रमाण शंभर ते दीडशेच्या आता स्थीरावले होते. मात्र दिवाळीच्या निमित्ताने अगोदर एक आठवडा व नंतरचा एक आठवडा शहरातील सर्वच बाजारपेठेत खरेदीसांठी मोठी गर्दी झाल्याचे दिसुन आले होते.

यावेळी अनेक जणांकडुन मास्कचा वापर केला जात नव्हता, तसेच सामाजिक अंतराचे भान देखील राहिले नव्हते. या एकुण निष्काळजीपणाचा परिणाम आता गेल्या दोन आठवड्यात दिसुन आला आहे. नोव्हेंबरच्या तिसर्या आठवड्यात एकुण रुग्णांचा आकडा लक्षात घेता प्रतिदिन 140 नवीन रुग्ण समोर आले होते. यानंतर चौथ्या आठवड्यात सरासरी रुग्णांचा आकडा 178 पर्यत गेल्यानंतर गेल्या आठवड्यात सरासरी नवीन रुग्णांचा आकडा 218 पर्यंत जाऊन पोहचला आहे. यामुळे नाशिककरांची चिंता तर वाढलीच, पंरंतु महापालिका प्रशासनाकडुन आता करोना संसर्ग रोखण्यासाठी पुन्हा काम सुरू झाले आहे.

नाशिक महापालिका प्रशासनाकडुन शहरात करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गेल्या चार महिन्यात संशयितांच्या चाचण्या, मोबाईल डिस्पेन्सरीद्वारे तपासणी, फिव्हर क्लिनिक व शेवटी माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम आदी कार्यक्रम घेण्यानंतर मागील दोन महिन्यात करोना संसर्गात लक्षणिय घट झाली आहे. असे असले तरी दिवाळीच्या निमित्ताने शहरात बाजारपेठेत झालेल्या गर्दीचे परिणाम दिसु लागले असुन आता प्रति दिन नवीन रुग्णांचा आकडा 200 च्यावर गेल्याचे दिसत आहे. असे असले तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण थेट 96 टक्क्यापर्यत गेले आहे.

राज्यात करोना रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात नाशिक महापालिकेची कामगिरी चांगली असुन ही टक्केवारी दिलासादायक ठरली आहे. नाशिक महापालिका क्षेत्रात आता करोना संसर्ग कमी झाला असुन आता नवीन करोना रुग्णांचा आकडा 150 ते 269 च्या आत आला आहे. गेल्या दोन अडीच महिन्यापासुन महापालिकेकडुन करण्यात आलेल्या उपाय योजना आणि करोना प्रभाव कमी झाल्यानंतर आरोग्य यंत्रणा - व्यवस्था कायम ठेवण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे.चालु डिसेंबर महिन्यात नवीन रुग्णांचा आकडा वाढत चालला असुन आता 200 ते 270 पर्यत गेला आहे.

शहरातील करोनाचा प्रभाव गत दोन महिन्याच्या तुलनेत वाढत असला तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाणात चांगले आहे. दि.5 डिसेंबर रोजी शहरात नवीन रुग्ण फक्त 214 इतके असल्याचे समोर आल्याने आता एकुण करोना रुग्णांची संख्या 67 हजार 781 इतकी झाली असुन यापैकी 65 हजार 056 जण बरे झाल्याने घरी गेले आहे. या आकडेवारीवरुन तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96 टक्के झाले आहे.

करोना रुग्णांची आठवडानिहाय स्थिती

आठवडा एकुणरुग्णवाढ सरासरी

8 ते 14 नोव्हेंबर 942 134

15 ते 21 नोव्हेंबर 985 140

22 ते 28 नोव्हेंबर 1250 178

29 नोव्हें. ते 5 डिसेंबर 1500 218