‘समृद्धी’च्या चालकाकडून पत्रकाराच्या अंगावर जेसीबी घालण्याचा प्रयत्न

रक्तदाब कमी झाल्याने नाशिक येथे उपचार सुरू
‘समृद्धी’च्या चालकाकडून पत्रकाराच्या अंगावर जेसीबी घालण्याचा प्रयत्न

सिन्नर । Sinnar

समृध्दी महामार्गाच्या कामावर असलेल्या अवजड वाहनांनी पूर्व भागातील रस्त्यांची पुरती वाट लावली असून मद्यधुंद चालकांच्या त्रासामुळे शेतकरी व ग्रामस्थांना रोजचाच त्रास होत आहे. काल (दि.5) रात्रीच्या सुमारास मध्यधुंद चालकाने ‘दै. देशदुत’चे वावी येथील बातमीदार संतोष भोपी यांच्या अंगावर जेसीबी घालण्याचा प्रयत्न केल्याने वावीकरांनी समृद्धी महामार्गाची अवजड वाहने अडवत आंदोलन केले. भोपी यांचा रक्तदाब कमी झाल्याने त्यांना नाशिक येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

शनिवारी (दि.6) रात्री समृध्दी महामार्गावर ठेकेदाराकडे कामाला असलेल्या जेसीबी चालकाने मद्यधुंद होऊन गावातून जेसीबी चालविला. यावेळी दशरथ आहेर यांच्या दुकानाला या जेसीबीचा धक्का लागला. धक्का मारून फरार होण्याच्या तयारीत असलेल्या जेसीबी लाचकाला येथील नागरिक नितीन शिवदे, देशदूत चे पत्रकार संतोष भोपी यांनी पाठलाग करत थांबविण्याचा प्रयत्न केला असता मध्यधुंद चालकाने त्यांच्या अंगावर जेसीबी घालण्याचा प्रयत्न केला.

त्यामुळे संतोष भोपी यांचा रक्तदाब कमी झाल्याने त्यांना उपचारासाठी नाशिक येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला असून समृध्दी महामार्गाची अवजड वाहने अडवून निषेध आंदोलन केले. संतप्त झालेल्या वावी ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांसह ग्रामस्थांनी समृध्दी महामार्गाच्या अवजड वाहनांना सकाळी 11 वाजेपासून अडवून धरले. मात्र रात्री उशीरापर्यंत समृध्दी महामार्गाच्या ठेकेदारासह कोणीही अधिकारी घटनास्थळी न फिरकल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

वावी येथील फुलेनगर, घोटेवाडी व कहांडळवाडी या चौफुलीवर अनेक अवजड वाहने ग्रामपंचायत पदाधिकार्‍यासह नागरिकांनी रोखून धरली आहे. सरपंच कन्हैयालाल भुतडा, माजी सरपंच विजय काटे, सदस्य प्रशांत कर्पे, विनायक घेगडमल, विजय सोमाणी, सचिन वेलजाळी, विलास पठाडे, संतोष जोशी, दशरथ आहेर, ज्ञानेश्वर खाटेकर, राकेश आनप, गणेश वेलजाळी, किशोर मालपाणी, सुनील जाधव, नितीन आनप यांच्यासह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

दरम्यान, उद्या (सोमवार) सकाळी 11 वाजेला पोलीसांच्या मध्यस्थीने समृद्धी महामार्गाच्या ठेकेदार प्रतिनिधी आणि ग्रामस्थ यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तोपर्यंत महामार्गाची वाहने सोडण्यात येणार नसल्याचे माजी सरपंच विजय काटे यांनी सांगीतले.

रस्त्यांची लागली वाट

समृद्धी महामार्गाला भराव टाकण्यासाठी ठेकेदाराकडून शेकडो अवजड वाहनांच्या माध्यमातून मुरूम, मातीची वाहतूक करण्यात येत आहे. या अवजड वाहनांमुळे परिसरातील सर्वच रस्त्यांची वाट लागली असून खड्डेमय रस्त्यांवरून वाहने चालविणे कठीण झाले आहे.

हे रस्ते दुरुस्त करण्याची जबाबदारी सबंधीत ठेकेदाराची असून अनेकवेळा मागणी करून देखील ठेकेदाराकडून याकडे दुर्लक्ष होत आहे. महत्वाचे म्हणजे ठेकेदाराला प्रशासन आणि राजकीय पदाधिकारी पाठीशी घालत असल्याने ठेकेदाराची मुजोरी वाढली असल्याचा आरोप वावी ग्रामस्थांनी केला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com