ऑक्सिजन वाहतूक वाहनांना रुग्णवाहिकेचा दर्जा

३० सप्टेंबरपर्यंत आदेश लागू राहणार
ऑक्सिजन वाहतूक वाहनांना रुग्णवाहिकेचा दर्जा

नाशिक | Nashik

कराेनाच्या पार्श्वभुमीवर देशात ऑक्सिजनची वाहतूक करणाऱ्या वाहनांना आता टाेल नाक्यावर शुल्क अदा करण्याची गरज पडणार नाही.

केंद्रीय रस्ते परिवहन मंत्रालयाने व राज्याच्या गृहविभागाने ऑक्सिजन वाहतूक करणाऱ्या वाहनांना रुग्णवाहिकेचा दर्जा देत सवलत जाहीर केली आहे. या वाहनांसाठी येणाऱ्या ३० सप्टेंबरपर्यंत हा आदेश लागू राहणार आहे.

केंद्र शासनाने माेटार वाहन अधिनियम १९८८ (५९) च्या धारा ६६ ची उपधारा (३) च्या खंड (ढ) द्वारे असलेल्या नियमांचे पालन करीत महामारीच्या काळात ऑक्सिजनची वाहतूक करणाऱ्या वाहनांना सवलत लागू केली आहे.

मुख्यालयाकडून आलेल्या आदेशांची तत्काळ अंमलबजावणी केली जात आहे. सर्व टाेलनाक्यांवर आॅक्सिजन वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांकडून शुल्क घेण्यात येणार नाही. विविध ठिकाणी ऑक्सिजन सिलिंडरची आयात केली जात आहे. या वाहनांना टाेल अदा करण्यासाठी नाक्यावर थांबावे लागत हाेते. मात्र, उशीरा का हाेईना रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी अत्यावश्यक गरज म्हणून ऑक्सिजन वाहतूक करणाऱ्या वाहनांना सवलत देण्यात आली आहे.

करोना संकटात औषधांसह ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. ऑक्सिजनची तूट भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्राला अन्य राज्यातून ऑक्सिजन उपलब्ध करून दिला आहे.

मात्र, यात वाहतूक आणि प्रवासाला लागणार वेळ ही मुख्य समस्या आहे. यासाठीच राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. परराज्यातून येणारी तसंच राज्यांतर्गंत ऑक्सिजन वाहन गाड्यांची वेगवान वाहतूक होऊन सर्वसामान्यांना वेळेत ऑक्सिजन मिळावा यासाठी सरकारने ऑक्सिजन वाहतूक करणाऱ्या वाहनांना रुग्णवाहिकेचा दर्जा दिला आहे.

याबाबतचे आदेश राज्याच्या गृह विभागाने काढले आहेत. यानुसार महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या गाड्यांचा टोल माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com