कौतुकास्पद ! रोजा ठेऊन गरजूंसाठी चालवत आहे रुग्णवाहिका

लासलगाव व खेड्यापाड्यातील रुग्णांसाठी उतरले मैदानात
कौतुकास्पद ! रोजा ठेऊन गरजूंसाठी चालवत आहे रुग्णवाहिका

नाशिक | फारूक पठाण

शहरासह ग्रामीण भागातील दिवसेंदिवस करोना रुग्ण संख्या वाढत आहे. अशा वेळी लहान-मोठ्या गाव खेड्यांमधून रुग्णांना मोठ्या शहरांमधील रुग्णालयात आणण्यासाठी रुग्णवाहिका अर्थात ॲम्बुलन्सची गरज मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या वातावरणात रुग्णवाहिका व चालकांची कमतरता भासत आहे.

म्हणून जिल्ह्यातील लासलगाव येथील काही मुस्लिम तरुणांनी पुढाकार घेऊन दुसऱ्या गावाहून एम्बुलेंस आणून स्वतः ते चालवत सर्वधर्मीयांना अहोरात्र परिश्रम करून मदत करत आहे. त्यामुळे एकात्मतेच्या अनोखा संदेश नाशिकमधून जगाला मिळत आहे.

विशेष म्हणजे सध्या पवित्र रमजान महिना सुरू असून हे तरुण रोजा (उपवास) ठेऊन सतत रुग्णवाहिका चालवत आहे.

लासलगाव व परिसरातील पिपंळगाव नजीक, ब्राह्मणगाव, विंचूर, टाकळी, उगाव, वेळापूर, आंबेगाव, पाचोरा, कोटमगाव आदी भागात करोना रुग्णसंख्या वाढत आहे तर येथील गाव खेड्यांमधून रुग्णांना घेऊन जाण्यासाठी ॲम्बुलन्सची गरज वाढली आहे. गावात पूर्वीपासून ज्या ॲम्बुलन्स होत्या त्या सतत व्यस्त आहे

गोरगरीबांना खाजगी रुग्णवाहिकाचे भाडे देखील परवडणारे नसल्यामुळे लासलगाव येथील मीरान पठाण व सोनू शेख या तरुणांनी पुढाकार घेऊन नाशिक मधील "जेएमसीटी' चे विश्वस्त हाजी रउफ पटेल यांनी उगावकरांसाठी रुग्णवाहिका दिली होती. ती रुग्णवाहिका नौशाद भाई यांना संपर्क करून ती लासलगावला आणली तसेच सोनू शेख यांनी थेट रुग्णवाहिका चालवायला सुरुवात केली, काही किरकोळ काम होते ते त्यांनी करून रुग्णांना नाशिक मध्ये आणण्यास प्रारंभ केला.

दरम्यान काही रुग्णांना ॲम्बुलन्स मध्ये ऑक्सिजनची गरज लागते म्हणून आता हे तरुण ॲम्बुलन्स मध्ये ऑक्सिजन लावण्याची धावपळ करीत आहे. अत्यंत अल्प दरात ही सुविधा खेड्यापाड्यातील लोकांना या मुस्लीम तरुणांनी उपलब्ध करून दिल्यामुळे हिंदू मुस्लिम एकतेचे अनोखा दर्शन होत आहे.

आम्ही आमचे मोबाईल नंबर सोशल मीडियावर टाकून दिले आहेत. यामुळे गरजू लोक संपर्क करीत आहे. रात्री दोन वाजता जरी कॉल आला तरी आम्ही रुग्ण घेऊन नाशिकला जात आहोत, आम्ही फक्त इंधनला लागणारा खर्च घेत आहोत, यामुळे गोरगरिबांचा फायदा होऊन वेळेवर त्यांना उपचार मिळत आहे.

- मिरान पठाण, समाजसेवक, लासलगाव

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com