इथेनॉलसोबतच कादवा करणार सीएनजी निर्मिती

इथेनॉलसोबतच कादवा करणार सीएनजी निर्मिती

दिंडोरी | वार्ताहर | Dindori

‘साखर उद्योग मोठ्या अडचणीतून मार्गक्रमण करत असताना कादवाची (kadwa) गाळप क्षमता दुप्पट केली असून केवळ साखर निर्मिती करून कारखाने चालणे शक् नसल्याने इथेनॉल प्रकल्पाचे (Ethanol project) काम सुरू केले आहे....

तसेच सीएनजी प्रकल्प (CNG project) ही सुरू करणार असल्याचे प्रतिपादन कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे (Shriram Shete) यांनी केले.

कादवा सहकारी साखर कारखान्याची (Kadwa Sahakari Sakhar Karkhana) 50 वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने चेअरमन श्रीराम शेटे यांचे अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. प्रारंभी स्वागत व्हा. चेअरमन उत्तम भालेराव (Uttam Bhalerao) यांनी केले.

पुढे बोलताना श्रीराम शेटे यांनी सभा ही ऑनलाईन घ्यावी हा शासनाचा आदेश असल्याने सभा ऑनलाईन घेण्यात येत असल्याचे सांगत कादवाची संपूर्ण वाटचाल विशद केली. साखर उद्योगाने अनेक चढ उतार बघितले आहे. परिस्थितीनुसार नफा तोटा होत आलेला आहे.

गेल्या वर्षी संपूर्ण राज्यात साखर उतारा घटला त्यात कादवा चाही साखर उतारा 0.49 टक्के कमी आल्याने साखर उत्पादन कमी होत नुकसान झाले. गेल्या वर्षीपेक्षा मळी व भुस्याला कमी भाव मिळाल्याने कमी उत्पन्न मिळत 11 कोटी 11 लाख 62 हजार कमी मिळाल्याने कारखान्यास 5 कोटी 75 लाख 56 हजाराचा तोटा झाला.

जर मागील वर्षाप्रमाने दर मिळाले असते तर कारखान्याला 5 कोटी 75 लाखाचा नफा झाला असता.देशात व राज्यात मोठ्या प्रमाणात साखर (Sugar) उत्पादन झाल्याने साखरेला उठाव नसल्याने मोठया प्रमाणात साखर शिल्लक आहे. आता साखरेचे भाव वाढत असून तोटा भरून निघण्याची अपेक्षा आहे.

राज्यातील सर्व साखर कारखाने गेल्या वर्षी दर कमी मिळाल्याने अडचणीत सापडले आहे. तोटे वाढत अनेकांना एफआरपी देता आलेली नाही. परंतु कादवाने संपूर्ण एफआरपी अदा केली आहे. कादवाने गाळप कार्यक्षमता दुप्पट केली आहे. कमी दिवसात जास्त गाळप होत उत्पादन खर्च कमी होत आहे.

वेळेत ऊसतोड व्हावी यासाठी यावर्षी गाव पातळीवर शेतकर्‍यांची समिती बनवत योग्य नियोजन करून वेळेत ऊस तोड केली जाईल असे सांगितले. केवळ साखर निर्मिती करून कारखाने चालणे शक्य होणार नसल्याने कारखान्याने इथेनॉल प्रकल्प हाती घेतला आहे. त्यास सभासद ऊस उत्पादक प्रतिसाद देत असून ठेवी ठेवत असून सर्वांनी ठेवी ठेवाव्या असे आवाहन केले.

केंद्र सरकारने (Central Government) इथेनॉल सोबतच सीएनजी प्रकल्प सुरू करण्याच्या सूचना करत काही सवलती देऊ केल्या असून सदर सीएनजी निर्मितीसाठी आवश्यक 75 टक्के कच्चा माल उपलब्ध आहे.

नाशवंत भाजीपाला तसेच हत्ती गवताचा वापर करत सदर गॅस निर्मिती करणे शक्य होणार असून सदर प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. इथेनॉल सीएनजी प्रकल्पास सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन शेटे यांनी केले.

मालतारण, मशिनरी आधुनिकीकरण, इथेनॉल प्रकल्प यासाठी कर्ज घेतले आहे. त्याची नियमित परतफेड सुरू असून कोणतेही कर्ज थकीत नाही. कारखान्याची आर्थिक स्थिती सुदृढ असल्याने बँक नवीन प्रकल्पासाठी कर्जपुरवठा करत आहे.

विस्तारीकरण, इथेनॉल प्रकल्पासाठी जे राजकीय विरोधक विरोध करत होते त्यांना सदर प्रकल्प होत कारखान्याची सुरू असलेली प्रगती बघवत नसल्याने ते राजकीय स्वार्थापोटी खोटे आरोप करत असल्याचे सांगत कुणाच्याही अपप्रचाराला बळी पडून नये कारखान्याचे हिताचे दृष्टीने आसवणी, इथेनॉल, सीएनजी प्रकल्प गरजेचे आहे. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे जास्तीत जास्त ऊस लागवड करावी, असे आवाहन केले.

यावेळी सभासद विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (narhari zirwal) यांनी कारखान्याचे विविध प्रकल्पांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल तसेच शेतीसाठी पाण्याची उपलब्धता करून दिली जाईल रस्त्यांचे कामे करण्यात येतील असे सांगितले. प्रकाश शिंदे यांनी काही खर्च दुप्पट झाले ठेवी गोळा करणे व शेअर्स रक्कम वाढ याबाबत प्रश्न विचारले.

सचिन बर्डे यांनी गणदेवी कारखान्याप्रमाणे ऊस भाव धोरण राबविणार का असा सवाल केला. शिवाजी शिंदे यांनी चांदवड तालुक्यात पाऊस कमी पडत असल्याने ऊस पुरवठा कमी होत असला तरी सीएनजी प्रकल्प करावा त्यासाठी आवश्यक गवत पुरवठा जास्तीत जास्त करू असे सांगितले.

प्रकाश पिंगळ, दिलीप शिंदे, शिवाजी शिंदे, मधुकर टोपे , विनायक काळे, संजय जाधव, संजय शिर्के, लक्षण देशमुख, प्रवीण संधान, आनंदा उगले आदींनी चर्चेत भाग घेत प्रश्न विचारले. विलास निरगुडे यांनी कर्ज तपशील व मयूर जाधव यांनी ऊस उत्पादन वाढीबाबत लेखी प्रश्न विचारले.

यावेळी सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना चेअरमन श्रीराम शेटे यांनी उत्तरे दिली. आभार संचालक शहाजी सोमवंशी यांनी मानले.

संचालक मंडळाने काय गुन्हा केला ?

विरोधक राजकीय द्वेषापोटी कारखान्याची प्रगती बघवत नसल्याने आपल्यावर आरोप करत असल्याचे सांगत श्रीराम शेटे यांनी कादवा ला बँकेने कर्जपुरवठा बंद केला होता तो सुरू केला हा गुन्हा आहे का?1250 मेंटन गाळप क्षमता आज 2500 मेंटन करत 2600 ,2700 मेंटन क्षमतेने गाळप करत आहे हा गुन्हा आहे का? बायोप्रोडक्ट नसताना उत्तर महाराष्ट्रात उसाला सर्वाधिक भाव दिला हा गुन्हा आहे का?

महाराष्ट्रातील नावाजलेल्या कारखान्यांच्या पंगतीत कादवाचे स्थान नेले हा गुन्हा आहे का? काळाची पाऊले ओळखत इथेनॉल सीएनजी प्रकल्प हाती घेतले हा गुन्हा आहे का? असे सांगत बंद पडायच्या अवस्थेतील कादवा सुरू ठेवत त्यास उर्जितावस्था आणण्याची शेतकर्‍यांच्या उसाला जास्त भाव मिळवून देण्याची जिद्द होती.

सभासदांनी विश्वास टाकला त्यास सार्थ ठरवत आज कादवाची प्रगती होत आहे. जर सुज्ञ सभासदांनी आपल्याला सांगितले की थांबा तर मी निवडणूकही लढवणार नाही परंतु संस्थेच्या हितासाठी कुणीही अपप्रचार करत कादवाचे प्रगतीला खीळ घालू नये असे चेअरमन श्रीराम शेटे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com