नुकसान भरपाईचे आठ दिवसांत वाटप करा

खरीप हंगाम कर्जवाटप आढावा बैठकीत कृषी मंत्री भुसे यांचे निर्देश
नुकसान भरपाईचे आठ दिवसांत वाटप करा

मालेगाव । प्रतिनिधी

खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी अवकाळी पावसाची नुकसानभरपाई, पीकविम्यासह विशेष अर्थसहाय्य योजनेच्या अनुषंगाने थेट बँक खात्यात वितरित करण्यात आलेल्या रकमांचे आठ दिवसांत शेतकर्‍यांना वाटप करावेत, असे स्पष्ट निर्देश कृषिमंत्री दादा भुसे यांनी येथे बोलताना दिले.

खरीप हंगामाच्या अनुषंगाने पीक कर्ज वाटपाची आढावा बैठक शासकीय विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी कृषिमंत्री भुसे यांनी शेतकर्‍यांना मदतीच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. आठ दिवसात या रकमेचे वाटप करत शेतकर्‍यांना दिलासा देण्याचे निर्देश त्यांनी अधिकार्‍यांना दिले.

याप्रसंगी उपमहापौर नीलेश आहेर, प्रांत डॉ. विजयानंद शर्मा, तहसीलदार चंद्रजीत राजपूत, सहायक निबंधक संगमेश्वर बदनाळे, अग्रणी बँकेचे प्रमुख शेखर, जिल्हा बँकेचे प्रशासकीय व्यवस्थापक आरीफ, स्टेट बँकेचे व्यवस्थापक पांडे यांच्यासह सर्व बँकांचे अधिकारी, सेवक उपस्थित होते.

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतीच्या मशागतीचे कामात शेतकरी बांधव व्यस्त आहेत. दुष्काळ, बेमोसमी पाऊस तसेच करोना संकटामुळे शेतकरी अगोदरच आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे त्यांना आज आर्थिक मदतीची गरज असून शासनामार्फत नुकसानभरपाई पोटी वितरित करण्यात आलेल्या रकमेवर कॅपिंग लावून शेतकर्‍यांना मिळालेल्या मदतीपासून वंचित ठेवल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. ही बाब योग्य नसल्याचे भुसे यांनी सांगत पुढील आठ दिवसांत शेतकर्‍यांना मदतीच्या रकमांचे वाटप करण्याच्या सूचना यावेळी दिल्या. जिल्हा बँकेच्या सर्व शाखा प्रमुखांनी लाभार्थ्यांशी प्रत्यक्ष संपर्क साधून त्यांना याबाबत अवगत करण्याबाबतही निर्देशीत केले.

तालुक्यात किमान 75 कोटीचे पीक कर्ज वाटप करा

करोनाच्या संकटकाळात सर्वसामान्य नागरिकांबरोबरच बळीराजाही प्रभावीत झाला आहे. या संकटकाळात येत्या हंगामासाठी त्याची आर्थिक मदतीची गरज ओळखून जिल्हा बँकेसह सर्व राष्ट्रीयकृत बँकांनी पुढाकार घेऊन मोठ्या प्रमाणात पीक कर्जाचे वाटप करण्याचे आवाहन करतांना यावर्षी तालुक्यात किमान 75 कोटीचे पीक कर्ज वितरित करण्याच्या सुचनाही ना. भुसे यांनी यावेळी दिल्या.

ब-सत्ता प्रकारातील मिळकतींचा प्रश्न मार्गी लावा

शासनाच्या मार्गदर्शक सुचनांची अंमलबजावणी करून ब-सत्ताप्रकार म्हणून नोंदविलेल्या जमिनींचे भोगवटादार वर्ग-1 या धारणाधिकारामध्ये रुपांतरीत करण्यासाठी तालुक्यातील काही प्रकरणे मूल्यांकनाअभावी प्रलंबित आहेत. शासनाच्या दरसूचीमधून सुटलेल्या मिळकतींचा समावेश होण्यासाठी पुढील पंधरा दिवसात कार्यवाही करण्याच्या सूचना भुसे यांनी दिल्या आहेत.

ब-सत्ता प्रकारातील प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेण्यासाठी शासकीय विश्रामगृहात बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी भुसे बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी धनंजय निकम, प्रांत डॉ.विजयानंद शर्मा, तहसिलदार चंद्रजित राजपूत, नगर भूमापन अधिकारी जितेंद्र भिंगारदिवे, उपअधीक्षक भूमी अभिलेख भगवान शिंदे, सहायक दुय्यम निबंधक पी.एन. लहाने, एस.व्ही. वाघ, पी.डी. वाघचौरे, संजय दुसाने, अ‍ॅड. सतीश कजवाडकर, बंडू माहेश्वरी आदी उपस्थित होते.

महसूल व नगर भूमापन विभागाने समन्वय साधत सातबारा उतारा व मिळकत पत्रिकेमध्ये मेळ घालून नागरिकांना दिलासा देण्याचे काम करावे. सत्ता प्रकार बदलामुळे शासनाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळणार आहे, त्याच बरोबर नागरिकांचे देखील प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार असल्याने प्राधान्याने ही प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याच्या सूचनाही दादाभुसे यांनी यावेळी दिल्या.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com