सर्वांनी शेतकर्‍यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज

‘कृषीथॉन’ उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री भुसे यांचे प्रतिपादन
सर्वांनी शेतकर्‍यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज

नाशिक । प्रतिनिधी Nashik

केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या वतीने शेतकर्‍यांना वेळोवेळी प्रकारची मदत करण्यात येत आहे, परंतु शेतकर्‍यांच्या पिकाला भाव मिळत नाही त्याकरिता समाजातील सर्व घटकांनी शेतकर्‍यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे, इतकेच नव्हे तर समाजाची मानसिकता बदलण्याची गरज आहे, कृषीथॉन प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकर्‍यांना नवनवीन तंत्रज्ञान व उद्योग कृषीवर आधारित उद्योगांची माहिती देण्यात येत आहे ही अत्यंत कौतुकास्पद आणि स्वागतार्ह बाब आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री दादा भुसे ( Guardian Minister Dada Bhuse )यांनी केले.

कृषिक्षेत्राच्या विकासासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकर्‍यांना मिळवून देण्यासाठी ह्युमन सर्व्हिस फाउंडेशन व मीडिया एक्झिबिटर्स प्रा.लि. यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कृषीथॉन’ ( Krishithon)प्रदर्शनाचे ठक्कर डोम, एबीबी सर्कल जवळ, त्र्यंबकरोड, नाशिक येथे दि. 24 ते 28 नोव्हेंबर दरम्यान आयोजन करण्यात आले असून या कृषीथॉन प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी भुसे बोलत होते.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून खा. हेमंत गोडसे, माजी खा. हरिश्चंद्र चव्हाण, माजी खा. देविदास पिंगळे, नाशिक अ‍ॅग्रो डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष विजय नाना पाटील, पंजाब नॅशनल बँकेचे महाव्यवस्थापक पुष्कर तराई आदी उपस्थित होते. तर व्यासपीठावर प्रदर्शनाचे आयोजक संजय न्याहारकर, अश्विनी न्याहारकर, साहिल न्याहारकर, मीडिया एक्झिबिटर्सचे संचालक नितीन मराठे, रश्मी हिरे आदींसह मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी दादा भुसे म्हणाले की, शेतकर्‍यांना सहाय्य करण्यासाठी विविध प्रकारचे कृषी तंत्रज्ञान विकसित होत आहे, या तंत्रज्ञानाचा प्रदर्शनाच्या माध्यमातून माहिती देण्याचा अत्यंत चांगल्या प्रकारे उपयोग होत आहे, या प्रदर्शनात शेतकर्‍यांना परिसंवादाद्वारे मार्गदर्शन करण्यात येत असून विविध प्रकारचे पुरस्कार देखील देण्यात येत आहेत.

शेती क्षेत्रात नवनवीन संशोधन होत असून ड्रोनद्वारे फवारणी, अतिवृष्टी, गारपीट, दुष्काळ व इतर अपत्ती प्रसंगी उपग्रहाच्या माध्यमातून मदत देण्याची नियोजन राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात येत असून नुकसान भरपाई देखील या माध्यमातून देण्यात येणार आहे, असेही भुसे म्हणाले. सध्या टोमॅटोला भाव नसून कांद्यालाही भाव नसल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. शेतकर्‍यांच्या विविध प्रश्नांसाठी राज्य सरकारच्या वतीने प्रयत्न करण्यात येत असून शेतकर्‍यांना पीक विम्याचे पैसे थेट बँक खात्यात वर्ग करण्यात येत आहेत, प्रधानमंत्री पिक विमा योजनासाठी बीड मॉडेल राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकारच्या वतीने शेतकर्‍यांसाठी राबविण्यात येणार्‍या विविध योजनांची माहिती भुसे यांनी याप्रसंगी दिली.

याप्रसंगी खासदार हेमंत गोडसे यांनी कृषिथॉनची व्याप्ती वाढत असून देशातील एकूण कृषी प्रदर्शनापैकी तिसरे मोठे आणि राज्यातील दुसरे मोठे हे कृषीथॉन प्रदर्शन असल्याने आयोजकांचे अभिनंदन केले. याप्रसंगी पंजाब नॅशनल बँकेचे महाव्यवस्थापक पुष्कर तराई यांनीही शेतकर्‍यांना बँके मार्फत सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रास्ताविक आयोजक साहिल न्याहारकर यांनी केले न्याहारकर म्हणाले की, गेल्या 24 वर्षांपासून कृषीथॉन प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत असून शेतकर्‍यांना नवनवीन कृषी संशोधनाची माहिती मिळावी, यासाठी आमचा प्रयत्न आहे. या प्रदर्शनात सुमारे 300पेक्षा जास्त स्टॉल असून 300 पेक्षा जास्त कंपन्या यात सहभागी झाले आहेत. इतकेच नव्हे तर सुमारे 45 हजार शेतकर्‍यांनी या प्रदर्शनासाठी नोंदणी केले असल्याचेही त्यांनी सांगितले.

याप्रसंगी कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. मान्यवरांचे स्वागत आयोजक साहिल न्याहारकर आणि अश्विनी न्याहारकर यांनी केले. सूत्रसंचालन हर्षल पाटील यांनी केले तर आभार नितीन मराठे यांनी मानले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com