नगर परिषद निवडणूक रणसंग्राम ठरणार लक्ष्यवेधी

नगर परिषद निवडणूक रणसंग्राम ठरणार लक्ष्यवेधी

बागलाण तालुक्याच्या (baglan taluka) राजकारणावर प्रभाव टाकणार्‍या सटाणा नगरपरिषद निवडणुकीचे (municipal elections) घोडा मैदान जवळ आल्याने इच्छुकांतर्फे मोर्चेबांधणीस प्रारंभ करण्यात आला आहे.

सटाणा । शशिकांत कापडणीस Satana

नगराध्यक्षपद नगरसेवकांमधून निश्चित होणार असल्यामुळे नवोदितांसह प्रस्थापितांच्या अपेक्षा देखील उंचावल्या असल्याचे दिसून येत आहे. विद्यमान नगराध्यक्ष सुनिल मोरे यांच्या शहर विकास आघाडी विरोधात राष्ट्रवादी (rashtrawadi), शिवसेना (shiv sena), काँग्रेस (congress) आदी पक्षांची महाविकास आघाडी ( Mahavikas Aghadi) उभी ठाकली आहे. ही महाविकास आघाडीच मैदानात उतरते की सर्व पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवितात याबद्दल जनतेत उत्सुकता आहे.

मात्र झालेली विकासकामे, रखडलेला विकास, विकासकामातील भ्रष्टाचार (Corruption) आदी मुद्यांवरून आघाडी व महाआघाडीत होत असलेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण तप्त झाले आहे. त्यामुळे नगर परिषद निवडणुकीचा रणसंग्राम लक्ष्यवेधी ठरणार असल्याचे दिसून येत आहे. सटाणा नगर परिषद लोकप्रतिनिधींची मुदत येत्या वर्षअखेरीस डिसेंबरमध्ये संपुष्टात येत आहे.

वार्डनिहाय निवडणूक (Ward wise election) घेण्याचा निर्णय राज्य शासनातर्फे घेण्याचे सुतोवाच केले जाताच अनेक इच्छुकांचे धाबे दणाणले होते. या निवडणुकीचा फटका पक्षाच्या उमेदवारासच बसण्याची शक्यता अधिक असल्याने बहुसदस्यीय पध्दतीने निवडणूक घेण्याचा आग्रह राज्य शासनाकडे करण्यात आला होता. पक्षीयहित डोळ्यासमोर ठेवत शासनाने देखील बहुसदस्यीय पध्दतीनेच निवडणूक घेण्याचे धोरण जाहीर केल्याने अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

ओबीसी आरक्षण आदी विविध मुद्यांमुळे निवडणूक कार्यक्रम अद्याप जाहीर झाला नसला तरी दोन-तीन महिने उशीराने कां होईना ही निवडणूक घेतली जाण्याचे संकेत मिळत आहे. फेब्रुवारी-मार्च महिन्यात नगर परिषदेची निवडणूक होवू शकेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे. मात्र निवडणूक होणार असल्याचे निश्चित असल्याने राजकीय फटकेबाजीस नेत्यांतर्फे प्रारंभ करण्यात आला आहे.

शहर विकास आघाडीने गेल्या पाच वर्षात पुनद पाणी पुरवठा योजनेसह इतर विकासकामांचा लेखा-जोखा शहरवासीयांसमोर मांडण्यास प्रारंभ केला आहे. तर विरोधक महाविकास आघाडीतर्फे शहरविकासाच्या मुद्यांबाबत काय मांडले जाते याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणूकीत लोकनियुक्त नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत काँग्रेसचे अ‍ॅड. विजय पाटील, राष्ट्रवादीचे काका रौदळ, भाजपचे बाळासाहेब सोनवणे व शिवसेनेचे

अरविंद सोनवणे या मातब्बर उमेदवारांच्या तुलनेत पालकमंत्री छगन भुजबळ (Guardian Minister Chhagan Bhujbal) यांचे निकटवर्तीय असलेले सुनिल मोरे यांनी विविध समाजघटकांची मोट बांधत, सटाणा शहर विकास आघाडीची स्थापना करीत निवडणुकीत बाजी मारली होती. सनपामध्ये सत्ता स्थापन करतांना, संख्याबळाचे समीकरण निश्चित करण्यासाठी मोरे यांनी भाजपशी घरोबा केला.

गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात भाजपचे खा.डॉ. सुभाष भामरे यांच्या माध्यमातून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) व इतर मंत्र्यांच्या सहकार्याने पाठपुरावा करीत पुनद पाणी पुरवठा योजना प्रत्यक्षात साकारण्यात त्यांना यश आले आहे. संपूर्ण पाच वर्षात केलेल्या कामांबाबत ‘आधी व नंतर’ अशी तुलनात्मक पद्धतीने माहिती जनतेसमोर सादर करण्यात नगराध्यक्ष यशस्वी ठरले आहेत.

पुनद योजनेचे पुर्ण श्रेय नगराध्यक्षांचे असल्याचा दावा त्यांच्या समर्थकांतर्फे सातत्याने केला जात असला तरी राष्ट्रवादी सनपात सत्तेत असतांना सातत्याने पाठपुरावा करत कळवण तालुक्यातील पुनद धरणात सटाणा शहरासाठी पाण्याचे आरक्षण प्राप्त केल्याचे माजी आ. संजय चव्हाण हे स्पष्ट करतात. तर भाजपचे तालुकाध्यक्ष संजय देवरे, शहराध्यक्ष राहुल सोनवणे, मंगेश खैरनार आदिंसह पदाधिकारी पुनद योजनेचे संपूर्ण श्रेय खा.डॉ. सुभाष भामरे यांचे असल्याचा दावा करीत आहेत. पुनद योजनेच्या श्रेयासाठी नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला असला तरी पुनदचे पाणी नळांमध्ये केव्हा येते याची प्रतिक्षा सटाणावासियांतर्फे केली जात आहे.

सटाणा शहर विकास आघाडीविरुद्ध निर्माण झालेल्या सटाणा महाविकास आघाडी मध्ये राष्ट्रवादीचे माजी आ. संजय चव्हाण, शिवसेना उपजिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे, शहर प्रमुख जयप्रकाश सोनवणे, काँग्रेसचे शहराध्यक्ष किशोर कदम, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, माजी नगराध्यक्ष पांडुरंग सोनवणे, विजय वाघ आदिंसह पदाधिकर्‍यांचा समावेश आहे.

नगरपरिषद निवडणूकीत महाविकास आघाडी होते की, स्वतंत्र लढती होतात, याबाबत निर्णय अद्याप गुलदस्त्यात असला तरी शहर विकास आघाडीविरूध्द महाविकास आघाडीच्या नेत्यांतर्फे कडवे आव्हान उभे केले जाईल याची चुणूक गत काही महिन्यांपासून होत असलेल्या आरोपांच्या भडीमारांवरून दिसून येत आहे.

भावी नगरसेवक होण्यासाठी इच्छुकांमध्ये तरुणांचा समावेश प्रामुख्याने दिसून येत आहे. दसरा-दिवाळीच्या निमित्ताने देण्यात येणार्‍या शुभेच्छांच्या माध्यमातून अप्रत्यक्ष प्रचाराचे कार्य सुरु झाले आहे. प्रत्येक प्रभागात डिजिटल फलकांव्दारे विकासकामांचे सादरीकरण केले जात आहे. शहराच्या राजकारणात मोरे यांनी शत्रूंना मित्र केले असले तरी, निकटच्या वर्तुळातील काही घटक दुरावल्याची देखिल स्थिती आहे.

गेल्या पाच वर्षांत ‘तुझ्या गळा माझ्या गळा, गुंफू मोत्यांची माळा’ असलेले भाजपा पदाधिकारी आता उघडपणे नगराध्यक्षांच्या विरोधात जाहीर टिकास्त्र सोडत आहेत. त्यामुळे यंदा देखील सटाणा शहर विकास आघाडी देखिल ‘एकला चलो’च्या मूडमध्ये असल्याचे बोलले जात आहे. आमदारकीत तालुक्याचे राजकारण ‘बोरसे-चव्हाण’ यांच्या भोवती केंद्रीत झाले असतांना शहरात झालेल्या ‘मोरे’ यांच्या उदयानंतर राजकीय समीकरणात बदल झाला आहे.

प्रत्येक प्रभागात मतांचे विभाजन होऊ नये, यासाठी करण्यात येणार्‍या नियोजनावर उमेदवारांच्या जय-पराजयाचे गणित अवलंबून आहे. पाच वर्षांपूर्वीच्या निवडणूकीत पारंपरिक प्रबळ उमेदवारांना टक्कर देतांना नगराध्यक्षांची पाटी कोरी होती. त्यामुळे यश प्राप्तीस अडचण आली मात्र पाच वर्षांत शहरात झालेल्या विकासकामांबाबत दावा करण्यात येत असला तरी, प्रत्यक्ष कामांचा खर्च व अतिरिक्त अंदाजपत्रकांबाबत विरोधकांतर्फे प्रश्न उपस्थित केले जात आहे. विकासकामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराबद्दल विभागीय आयुक्त, जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रारी केल्या जात आहे. त्यामुळे नगर परिषद निवडणूक रणसंग्राम गाजणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com