पानवेलींच्या विळख्यात अडकतोय अभयारण्याचा श्वास

पानवेली काढण्याबाबत पाटबंधारे विभागाची उदासिनता, दुर्गंधीमुळे आरोग्य धोक्यात
पानवेलींच्या विळख्यात अडकतोय अभयारण्याचा श्वास

निफाड। आनंद जाधव | Niphad

नांदूरमध्यमेश्वर धरणातील (Nandurmadhyameshwar dam) पाण्यावर पानवेलींनी मोठ्या प्रमाणात बस्तान बसविले असून या पानवेलींची दुर्गंधी परिसरात पसरून नागरिकांचे आरोग्य (health) धोक्यात आले आहे.

तसेच पानवेलींमुळे नदीपात्रातील पाणी दुषित (Contaminated water) बनले आहे. पानवेली काढण्याबाबत पाटबंधारे विभागाकडून (Irrigation Department) ठोस कार्यवाही होत नसल्याने येथील पक्षांचा अधिवास देखील धोक्यात आला असून पानवेलींच्या विळख्यामुळे पक्षी अभयारण्याचा (Bird sanctuaries) श्वास गुदमरू लागला आहे.

नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात (Nandurmadhyameshwar Bird Sanctuary) दरवर्षी हिवाळ्यात देश-विदेशातील पक्षी हजारो कि.मी. चा प्रवास करीत दाखल होत असतात. पाणथळ व दलदलीच्या प्रदेशामुळे पक्षांना अन्न शोधणे सुलभ होत असल्याने येथे पक्षांची वाढच होतांना दिसत आहे. साहजिकच दरवर्षी हिवाळ्यात येथे पर्यटकांची (Tourist) संख्या देखील वाढत असून शासनाने या परिसराला नुकताच ‘रामसर’ चा दर्जा दिला आहे.

मात्र रामसरची घोषणा होवून वर्षभरापेक्षा जास्त कालावधी उलटून देखील येथे पर्यटकांसाठी कुठलीही विकासकामे झालेली नाहीत. उलट दरवर्षी गोदावरी नदीपात्रात (Godavari river) पानवेलींचे प्रस्थ वाढतांना दिसत आहे. सायखेडा (Saykheda) नदीपात्रापासून ते नांदूरमध्यमेश्वर धरणापर्यंत मोठ्या प्रमाणात पानवेली दिसून येतात.

या पानवेलींमुळे नदीपात्रातील पाणी दुषित झाल्याने हे पाणी जनावरे देखील पीत नाहीत. तसेच नाशिक महानगरपालिका (Nashik Municipal Corporation) आपले सांडपाणी गोदावरी नदीपात्रात सोडत असल्याने व औद्योगिक वसाहतीचे (Industrial colony) पाणी देखील नदीपात्रातून वाहत येत असल्याने नदीपात्रातील जलसंपदा नष्ट होत आहे.

साहजिक मासे, कासव, खेकडे यासह जलचर प्राणी मृत होण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच याच पानवेलींची दुर्गंधी कोठुरे, करंजगाव, शिंगवे, सायखेडा, चांदोरी, भुसे, चापडगाव, मांजरगाव, काथरगाव, कुरुडगाव, सुंदरपूर, खानगावथडी आदी नदीकाठच्या गावात पसरून या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तर याच पानवेलींचा फटका देश-विदेशातून येणार्‍या पक्षांना देखील बसत असून येथील पक्षी अभयारण्यातील पक्षांचा अधिवास धोक्यात आला आहे.

येथील जगप्रसिद्ध पक्षी अभयारण्याची (Bird sanctuaries) ख्याती सर्वदूर असून येथे येणार्‍या पर्यटकांची संख्या देखील मोठी आहे. त्यामुळे येथील पक्षांचा अधिवास कायम राहण्यासाठी त्यांची सुरक्षितता महत्वाची असल्याने या अभयारण्याचा गुदमरणारा श्वास मोकळा होण्यासाठी पाटबंधारे विभागाने (Irrigation Department) धरण परिसरातील पानवेली काढणे गरजेचे असून याबरोबरच अभयारण्य परिसरातील लोखंडी टॉवरची पडझड झाली असून अनेक टॉवर जिर्ण झाले आहेत.

तर यापैकी अनेक टॉवर हे घनदाट काटेरी झुडपात गडप झाले असून वनविभागाने नव्याने टॉवरची उभारणी करून सदरील टॉवर कडे जाण्यासाठी रस्त्यांची निर्मिती करावी. या अभयारण्यात पर्यटकांना पक्षी निरीक्षणाबरोबरच या परिसरातील पुरातन मंदिरे, वाडे, धबधबे व धरण परिसराचा आनंद लुटता यावा यासाठी वनविभागाने शासन दरबारी पाठपुरावा करून योग्य ते प्रयत्न करावे अशी मागणी पक्षी प्रेमी, पर्यटक व नागरिक करीत आहेत.

पानवेली काढण्याची मोहिम राबवावी पाटबंधारे विभागाकडून नदीपात्रातील पानवेली काढण्याची मोहिम जेव्हा राबविली जाते त्यावेळी या पानवेली फक्त नदीपात्रात कडेला लोटल्या जातात. प्रत्यक्ष पाण्याच्या बाहेर पानवेली काढल्या जात नाहीत. पानवेली काढण्याच्या नावाखाली शासनाचा निधी मात्र हडप केला जात आहे. पानवेलींमुळे परिसरात दुर्गंधी पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते. तसेच पक्षांचा अधिवास देखील धोक्यात येतो. नदीपात्रातील पाणी शुद्ध रहावे यासाठी संपूर्ण पानवेली काढणे गरजेचे आहे. कारण याच नदीपात्रातून अनेक गावांसाठी सार्वजनिक पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहेत. त्यामुळे पानवेली काढणे गरजेचे आहे.

गणपत हाडपे, शेतकरी (मांजरगाव)

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com