स्मशानभुमीत मद्यपी-जुगार्‍यांचा अड्डा; आंदोलन इशार्‍यानंतर स्वच्छतेस सुरूवात

स्मशानभुमीत मद्यपी-जुगार्‍यांचा अड्डा; आंदोलन इशार्‍यानंतर स्वच्छतेस सुरूवात

मालेगाव । प्रतिनिधी | Malegaon

संगमेश्वरातील (Sangameshwar) बाल स्मशानभुमीची (Children's Cemetery) चारही बाजुने वाढलेली काटेरी झुडपे, अस्वच्छतेमुळे दुरवस्था झाली आहे.

मनपा व लोकप्रतिनिधींनी केलेल्या दुर्लक्षामुळे स्मशानभुमीचा ताबा मद्यपी (Alcoholic) व जुगार्‍यांनी (Gamblers) घेतला असून रोज रात्री स्मशानभुमीत मद्यपी धुमाकुळ घालत आहेत. मोकाट कुत्रे पुरलेली मृतदेह (Corpses) उकरून काढत विटंबना करण्याचे प्रकार देखील सातत्याने घडत असून स्मशानभुमीलगत अतिक्रमण (Encroachment) थाटले जात आहे.

बाल स्मशानभुमीच्या या दुरवस्थेसंदर्भात सार्वजनिक नागरी सुविधा समितीच्या (Public Civic Facilities Committee) पदाधिकार्‍यांनी स्मशानभुमीतच ठिय्या मांडत आंदोलनाचा (agitation) पवित्रा घेताच मनपा प्रभाग अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली असता यावेळी समितीचे अध्यक्ष रामदास बोरसे, उपाध्यक्ष भरत पाटील, कैलास शर्मा, किरण पाटील, राजू तिवारी, अण्णा पगारे, गोपाल सोनवणे, जितेंद्र देसले आदी पदाधिकार्‍यांनी बाल स्मशानभुमीच्या दुरवस्थेकडे प्रभाग अधिकारी जगदीश बडगुजर यांचे लक्ष वेधले. स्मशानभुमीच्या चारही बाजुंनी काटेरी व इतर वृक्ष फोफावले आहेत.

स्मशानभुमीच्या दरवाजाचे कुलूप तोडण्यात येवून मद्यपी रात्री स्मशानभुमीत (Cemetery) येवून मद्याचे सेवन करीत असल्याने तसेच जुगारी पत्ते खेळत असल्याने ठिकठिकाणी मद्याच्या रिकाम्या बाटल्या व पडलेले पत्ते मनपा अधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. मोकाट कुत्रे माती उकरून मृतदेह बाहेर काढत विटंबना करीत असल्याची तक्रार देखील यावेळी परिसरातील नागरीकांतर्फे केली गेली.

बाल स्मशानभुमीच्या जवळच संगमेश्वर पोलीस चौकी (Sangameshwar Police Station) असून या ठिकाणी सतत पोलिसांचा बंदोबस्त असतो. असे असतांना देखील रात्री बालस्मशानभुमीत मद्यपींची बैठक रंगत असून त्यांच्या जोडीला जुगारी देखील पत्ते कुटत बसत असल्याची तक्रार नागरीकांतर्फे करण्यात आली. मद्यपींच्या गोंधळाचा त्रास मोठ्या प्रमाणात होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

बाल स्मशानभुमीची दुरवस्था झाली असून मनपा प्रशासन व पोलिसांच्या दुर्लक्षामुळे स्मशानभुमी मद्यपी व जुगार्‍यांचा अड्डा बनली आहे. परिसरातील काही लोकांनी स्मशानभुमीलगत अतिक्रमण (Encroachment) थाटण्यास देखील प्रारंभ केला आहे. स्मशानभुमीची जागा गिळंकृत करण्याचा डाव अतिक्रमणधारकांचा असल्याचे दिसून येत आहे. शहरात विविध विकासकामे साकारली जात असून मोठ्या प्रमाणात कमानी उभारल्या जात असल्याने झोपडपट्टीऐवजी कमानींचे शहर अशी नवी ओळख मालेगावची निर्माण होत आहे.

कोट्यवधी रूपयांचा खर्च कमानींवर केला जात असतांना बाल स्मशानभुमीच्या दुरवस्थेकडे मनपा प्रशासन व लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत असल्याबद्दल समितीचे अध्यक्ष रामदास बोरसे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. बाल स्मशानभुमीची दुरवस्था त्वरीत दूर न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा समिती पदाधिकारी व नागरीकांनी देताच प्रभाग अधिकारी बडगुजर यांनी स्मशानभुमीत तात्काळ स्वच्छता मोहिम राबविण्याचे आश्वासन दिल्याने नागरीकांनी स्मशानभुमीतून काढता पाय घेतला. दरम्यान, स्मशानभुमीच्या दुरवस्थेसंदर्भात नागरी समितीतर्फे आक्रमक पवित्रा घेतला जाताच मनपातर्फे स्मशानभुमीत स्वच्छता मोहिम हाती घेण्यात आली आहे. वाढलेली व वाळलेली काटेरी वृक्ष काढण्यासह परिसरातील घाण, कचरा उचलण्याचे काम स्वच्छता विभागाच्या सेवकांतर्फे हाती घेण्यात आले होते.

Related Stories

No stories found.