अक्षय्य तृतीया विशेष :  अक्षय्यतेची समृद्ध परंपरा!

अक्षय्य तृतीया विशेष : अक्षय्यतेची समृद्ध परंपरा!

नाशिक । अमृता वाडीकर

ज्याचा क्षय होत नाही ते अक्षय्य! अक्षय्य म्हणजे शाश्वत, निरंतर, कायमस्वरूपी टिकणारं. अक्षय्य तृतीया आपल्याला याच शाश्वततेचं महत्त्व समजावून सांगत असते. आकाशातला सूर्य आपल्याला अक्षय्य अशी ऊर्जा देत असतो. चंद्राकडून शाश्वत शीतलता मिळत असते. हीच शाश्वतता आपण आपल्या आयुष्यात जपायला हवी. जगण्यातला शाश्वत आनंद मिळवायला हवा. हाच अक्षय्य तृतीयेचा सांगावा आहे. खरं तर आपण जगण्यातला निखळ आनंद शोधायला हवा. तो आनंद आपल्या आसपास ठासून भरलेला आहे. गरज आहे ती आपला दृष्टिकोन बदलण्याची.

माणूस आज तांत्रिकदृष्ट्या प्रगत बनला आहे. चंद्रच नाही तर मंगळापर्यंत पोहोचला आहे. माणसाने हे सगळं साध्य करण्याला कारणीभूत ठरली ती त्याची सकारात्मक वृत्ती, जीवन जगण्याची ऊर्मी आणि कोणत्याही परिस्थितीत तरून जाण्याची इच्छाशक्ती. कारण याच बाबी अक्षय्य आणि शाश्वत आहेत.

एका पिढीकडून दुसर्‍या पिढीपर्यंत पोहोचत आहेत. नकारात्मकता क्षणभंगूर आहे. ती काही काळ आपलं आयुष्य व्यापू शकते मात्र कायमस्वरूपी टिकून राहू शकत नाही. वार्‍याची झुळुक निराळाच आनंद देऊन जात असते. झुळूझुळू वाहणारी नदी जीवनाचं संगीत ऐकवत असते. ढगांमधून बरसणारा पाऊस तप्त उन्हाने तापलेल्या धरणीमातेला थंडावा देऊन जातं, ऋतूचक्र बदलतं. शिशिरात पानगळती होते तर वसंतात झाडांना नवी पालवी फुटते. उन्हाळ्यानंतर येणारा पाऊस सुखद गारवा घेऊन येतो. आपल्याला पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर निसर्गानेच देऊन ठेवलं आहे. दु:खानंतर सुख येणार आहे आणि हे सुख अक्षय्य आनंदाचा ठेवा आहे. आपणही यातूनच धडा घेत पुढे जायचं आहे.

आपल्या भारतीय संस्कृतीची नाळ निसर्गाशी किती घट्ट जोडली गेली आहे हे सणउत्सवांच्या गर्भात डोकावल्यास सहज लक्षात येईल. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी माठाची पूजा करण्याची प्रथा आहे. उन्हाळा सुसह्य व्हावा आणि त्यानंतर वर्षाऋतूने पृथ्वी सुजलाम-सुफलाम व्हावी ही भावना त्यामागे आहे. उन्हाळ्यात वणवे लागू नयेत म्हणून सृष्टीला सांभाळायचं आहे आणि दुसरीकडे मानवी संस्कृतीच्या सत्य, दया, परोपकार, बंधूता या शाश्वत अशा मूल्यांचा ठेवा जतन करायचा आहे. निसर्ग अक्षय्य आहे. तो जपला तरच आपण टिकणार आहोत, हा विचार आपल्या संस्कृतीने मनामनात घट्ट रूजवला आहे.

आज हाच विचार जोपासण्याची नितांत आवश्यकता आहे. अक्षय्य तृतीयेला कुंभाचं पूजन करुन माठातलं पाणी पिण्यास सुरूवात करतात. अनेकजण या दिवसापासून आंबा खायला सुरूवात करतात. कारण यानंतरचा काळ आंबा खाण्याच्या दृष्टीने योग्य मानला जातो. तो बाधत नाही, असं मानलं जात. याच काळात नद्यांचं पूजन केलं जातं. हा संपूर्ण उत्सव उन्हाळा सुसह्य करण्यासाठी असतो तसंच निसर्गातले पाणवठे सांभाळण्यासाठीही असतो. पाणवठे हे सृष्टीमधलं प्राणकेंद्रं आहेत. पाण्याशिवाय जीवन व सजीवांचं अस्तित्व शक्य नाही. पाण्यावर आधी सृष्टीतल्या सर्व प्राण्यांचा हक्क असून त्यानंतर माणसाचा हक्क आहे, असाही याचा अर्थ होतो.

या विचारांचा अवलंब आजच्या काळात व्हायला हवा. दसरा, दिवाळी पाडवा, गुढीपाडवा आणि अक्षय्य तृतीया अशा साडेतीन मुहूर्तांवर सोनं खरेदी करण्याचीही प्रथा आहे. प्रत्यक्ष दुकानात जाऊन सोन्याची खरेदी एवढाच याचा सरळसाधा अर्थ असू शकत नाही. कष्टातून आपलं ऐश्वर्य वाढवण्यालाही जीवनाचं सोनं करणं म्हणतात. माणूस परोपकार करून, समाजसेवा करून अक्षय्य असा आनंद मिळवू शकतो. कोरोनाच्या या भीषण काळात मदतीसाठी पुढे सरसावलेले असंख्य हात, स्वत:ची पर्वा न करता रूग्णांना, त्याच्या नातेवाईकांना दिलासा देणारे अनेक चेहरे जीवनाचं सोनं करण्याची व्याख्याच अधोरेखित करत आहेत. भविष्यातही हीच पुंजी आपल्याला उपयोगी पडणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com