
नाशिक | Nashik
काही महिन्यापूर्वी ठाकरे गटाच्या १२ नगरसेवकांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत (Shinde group) प्रवेश करून नाशकात ठाकरेंच्या शिवसेनेला (shivsena) मोठे खिंडार पाडले होते. त्यावेळी बाळासाहेबांच्या शिवसेनेत (Balasaheb's Shiv Sena) प्रवेश करणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने माजी नगरसेवक व महापालिकेचे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते (Ajay Boraste) राजू लवटे (Suryakant Lovette) यांच्यासह आदी नगरसेवकांचा समावेश होता. त्यानंतर आता बाळासाहेबांच्या शिवसेनेचे प्रमुख आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या माजी नगरसेवकांवर मोठी जबाबदारी सोपवली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या नाशिक जिल्हा सहसंपर्कप्रमुखपदी राजू लवटे व नाशिक जिल्हाप्रमुखपदी अजय बोरस्ते यांची निवड केली आहे. बाल शिवसैनिक ते सहसंपर्क प्रमुख असा प्रवास पाहिलेले राजू लवटे यांनी २०१४ मध्ये नाशिक पूर्व मधून विधानसभा निवडणूक लढवलेली असून अशा ज्येष्ठ जुन्याजाणत्या नेत्याकडे सहसंपर्क प्रमुखपदाची जबाबदारी सोपवली आहे.
तर शिवसेना महानगरप्रमुख, मनपा गटनेते, मनपा विरोधी पक्षनेते अशा विविध जबाबदारी पार पाडलेल्या अजय बोरस्ते यांच्याकडे जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. २०१७ च्या नाशिक महानगर पालिका निवडणुकीवेळी शिवसेनेची संपूर्ण जबाबदारी अजय बोरस्ते यांच्या खांद्यावर होती. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक जिल्ह्याची धुरा अजय बोरस्ते यांच्याकडे सोपवली आहे.
यावेळी बोरस्ते म्हणाले की, येत्या काळात बाळासाहेबांच्या शिवसेनेचा भगवा संपूर्ण नाशिक शहर व जिल्ह्यात पोहचवून शिवसैनिकांचे सर्वत्र जाळे पसरवण्याचे काम करत नाशिकच्या विकासासाठी काम उभे करू. तसेच येणाऱ्या नाशिक महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत बाळासाहेबांची शिवसेना व भारतीय जनता पार्टी यांच्या युतीचे राज्य येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, याप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्यासह आदी उपस्थित होते.