कठोर भूमिका, कारवाई, अंमलबजावणी करा

कठोर भूमिका, कारवाई, अंमलबजावणी करा

कृषिमंत्री दादा भुसे यांचे प्रशासकीय अधिकार्‍यांना निर्देश

मालेगाव । प्रतिनिधी

गेल्या दोन दिवसांपासून करोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण समाधानकारक असले तरी गतवर्षीच्या तुलनेत मृत्युदर वाढला आहे. करोना महामारीत आपण चांगली माणसे गमावली असून ही महामारी रोखण्यासाठी सर्व प्रशासकीय अधिकार्‍यांनी कठोर भूमिका, कारवाई व अंमलबजावणी केल्याशिवाय करोना नियंत्रणात येणार नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील संशयित व बाधित रुग्णांनी संस्थात्मक विलगीकरणास विरोध केल्यास थेट फौजदारी स्वरुपाची कारवाई करण्याचे निर्देश कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिले आहेत.

शहरासह ग्रामीण भागातील करोनाची आढावा बैठक शासकीय विश्रामगृहात पार पडली. याप्रसंगी भुसे बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी धनंजय निकम, मनपा आयुक्त भालचंद्र गोसावी, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, प्रांत डॉ. विजयानंद शर्मा, उपायुक्त नितीन कापडणीस, तहसीलदार चंद्रजित राजपूत, गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शैलेश निकम, अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ. हितेश महाले, आरोग्य अधिकारी डॉ. सपना ठाकरे, डॉ. शुभांगी अहिरे, डॉ. पोतदार आदी उपस्थित होते.

तालुक्यात सुरुवातीला करोनाच्या हॉटस्पॉट असलेल्या 38 गावांची संख्या कमी होऊन आज 19 वर आल्याचे सांगताना भुसे म्हणाले, या 19 गावांतील ज्या ग्रामदक्षता समित्या आहेत त्यातील तलाठी, ग्रामसेवक व पोलीसपाटील यांनी परिश्रम घेण्याची आवश्यकता आहे.

या गावातील संशयित रुग्ण गावभर फिरणार नाहीत याची काळजी घ्यावी, तसेच बाधित रुग्णाच्या घराची प्रत्यक्ष पडताळणी करून गरजेनुसार त्यास संस्थात्मक विलगीकरणात ठेवावे. त्याने विरोध केल्यास त्यास थेट मालेगाव येथील करोना सेंटरमध्ये दाखल करण्यात यावे. अशा रुग्णांकडून विलगीकरणासाठी प्रतिसाद न मिळाल्यास थेट फौजदारी स्वरुपाची कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

शहरातील रुग्णसंख्या नियंत्रित ठेवण्यासाठी छोटी प्रतिबंधित क्षेत्र तयार केल्यास नागरिकांची गैरसोय टाळण्यासह अशा प्रतिबंधित क्षेत्रात सेवासुविधा देण्यासही मदत होणार असल्याचे भुसे म्हणाले. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात लसीकरणाची टक्केवारी कमी असल्याची खंत व्यक्त करत शहरी भागात मोठ्या प्रमाणात जनजागृती करून लसीकरणाचे प्रमाण वाढवण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com