पाणीटंचाई निषेधार्थ हंडामोर्चा

पाणीटंचाई निषेधार्थ हंडामोर्चा

अंबासन । वार्ताहर | Ambasan

सूर्याचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत असल्याने बागलाण तालुक्यातील (Baglan taluka) काही गावांना तीव्र पाणीटंचाईचा (Water scarcity) सामना करण्याची वेळ येवून ठेपली आहे. टंचाईग्रस्त गावांमधून पिण्याच्या पाण्यासाठी टँकर (water tanker) सुरू करण्याची मागणी होवू लागली असतांनाच रातीरच्या महिलांनी हंडामोर्चा काढत ग्रा.पं. सदस्यांना कार्यालयात डांबून आंदोलन (agitation) केले.

उन्हाच्या तीव्रतेमुळे रातीर परिसरातील कूपनलिका व विहिरींनी तळ गाठण्यास सुरवात केली आहे. येथील महिलांना हंडाभर पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. महिलांच्या संतापाचा सोमवारी (दि. 4) उद्रेक होवून ग्रामपंचायत कार्यालयावर हंडामोर्चा काढण्यात आला. नेहमीप्रमाणे ग्रा.पं. कार्यालयात सदस्य कामकाजासाठी येवून बसले असतांनाच गावातील रणरागिणींनी धडक मोर्चाद्वारे येवून ग्रा.पं. कार्यालयात कुलूप ठोकले. त्यामुळे ग्रा.पं. सदस्य कार्यालयात कोंडले गेले.

यावेळी संतप्त महिलांनी पाणीटंचाईबाबत (Water scarcity) सदस्यांना जाब विचारला असता ग्रा.पं. प्रशासनाने पिण्याच्या पाण्यासाठी यापूर्वीच वरिष्ठांकडे टँकरचा प्रस्ताव सादर केल्याचे सांगण्यात आले. परिसरात अनेक वर्षांपासून पाणीटंचाईचे संकट असतांना प्रशासन मात्र ठोस निर्णय घेत नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. गावास पाणीपुरवठा करणार्‍या विहिरी, कूपनलिका व हातपंप वाढत्या तापमानामुळे यापूर्वीच आटले आहेत. त्यामुळे ग्रा.पं. प्रशासन स्वखर्चाने ग्रामस्थांची तहान भागवित होते.

दोन दिवसांपासून विजेच्या लपंडावामुळे टँकर येवू शकला नाही त्यामुळे ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईचा प्रश्न भेडसावला. परिसरातील रातीर, रामतीर, सुराणे, वायगाव, सातमाने आदी गावांमध्ये पाणीटंचाईचे संकट दिवसागणिक वाढत असल्याने टँकरची मागणी केली जात आहे. सुराणे गावाजवळील चिरखांड धरण देखील कोरडेठाक पडले असून प्रशासनाने गंभीर दखल घेवून टँकरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

रातीरसह परिसरातील गावांना उन्हाळ्याच्या प्रारंभापासूनच पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. पाणीटंचाईतून कायमस्वरूपी मुक्तता मिळण्यासाठी गत 50 वर्षांपासून परिसरातील ग्रामस्थ प्रलंबित हरणबारी उजव्या कालव्याच्या प्रतिक्षेत आहेत. संघर्ष समितीसह ग्रामस्थ कालव्याच्या कामासाठी पाठपुरावा करीत आहेत. या कालव्याचे काम झाल्यास पाणीटंचाईचा प्रश्नही कायमस्वरूपी निकाली निघणार आहे. यास्तव प्रशासनाने हरणबारी उजव्या कालव्याचे काम त्वरीत हाती घ्यावे, अशी अपेक्षाही ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

Related Stories

No stories found.