मानधन तत्वावर काम करणार्‍या सेवकांचे आंदोलन

मानधन तत्वावर काम करणार्‍या सेवकांचे आंदोलन

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

महानगरपालिकेत अनेक वर्षापासून मानधन तत्वावर काम करणार्‍या स्वच्छता विभागातील सेवकांना कामावरून कमी करण्यात आल्याने संतप्त झालेल्या महिला-पुरूष सेवकांनी मनपा प्रवेशव्दारावर कायमस्वरूपी सेवेत घ्यावे या मागणीसाठी ठिय्या आंदोलन केले.

मानधनावरील ( honorarium basis ) 380 स्वच्छता सेवकांना रस्ते व गटार स्वच्छतेचा ठेका देण्यात आल्याने कामावरून कमी करण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला आहे. करोनासारख्या संकट काळात देखील या सेवकांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता स्वच्छतेचे काम केले आहे. ठेका दिल्याने या स्वच्छता सेवकांना पुर्व सूचना न देता कामावरून कमी करण्यात आल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट लादले गेले आहे. या सेवकांनी गत अनेक वर्षापासून काम केले असल्याने त्यांना कायमस्वरूपी सेवेत घेण्यात यावे, अशी मागणी बहुजन समाज पक्षाचे प्रदेश सचिव आनंद आढाव यांनी यावेळी बोलतांना केली.

शहरातील प्रभाग 2 व 3 मध्ये रस्ते व गटार स्वच्छतेचा ठेका देण्यात आल्याने संबंधित ठेकेदाराने आजपासून कामास प्रारंभ केला आहे. या पार्श्वभूमीवर पुर्वी मानधनावर सदर काम करत असलेल्या सुमारे 380 महिला-पुरूष स्वच्छता कामगारांना कामावरून कमी करण्याचा निर्णय मनपा प्रशासनातर्फे घेण्यात आला आहे. कामावरून कमी करण्यात आल्याने संतप्त झालेल्या स्वच्छता सेवकांनी आज बसपाचे प्रदेश सचिव आनंद आढाव यांच्या नेतृत्वाखाली प्रवेशव्दारावर ठिय्या आंदोलनास प्रारंभ केला. जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, शहराध्यक्ष सुनील पवार, जहूर शेख, राजू जाधव, दिलीप पाथरे आदी पदाधिकार्‍यांसह मोठ्या संख्येने महिला सेवक आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

गेल्या अनेक वर्षापासून मानधन तत्वावर मनपाच्या सेवेत स्वच्छता कामगार सेवा देत होते. करोना काळातही या सेवकांनी आपले काम नियमाप्रमाणे केले आहे. स्वच्छतेचा ठेका देण्यात आल्याने या सर्व कामगारांवर उपासमारीचे संकट उभे ठाकणार आहे. राज्य शासनाने 3 जून 2021 रोजी जीआर काढून मानधन कर्मचार्‍यांना आस्थापना सेवेत सामावून घ्यावे, असा आदेश दिला असतांनाही या संदर्भात मनपाने निर्णय घेतलेला नाही. 380 कुटूंबावर उपासमारीचे संकट उभे ठाकणार आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाने या संदर्भात सहानभुतीने निर्णय घेत सर्व मानधनावरील सेवकांना कायमस्वरूपी सेवेत घ्यावे, दडपशाहीने मानधन कर्मचार्‍यांचा बळी दिला गेल्यास बसपातर्फे तीव्र जनआंदोलन हाती घेण्याचा इशारा यावेळी आढाव यांनी दिला.

स्वच्छता विभागाचे सहाय्यक आयुक्त अनिल पारखे यांनी ठिय्या आंदोलन करणार्‍या सेवकांशी चर्चा करत त्यांच्या मागण्या समजून घेत निवेदन स्विकारले. या संदर्भात आयुक्तांशी चर्चा केली जाईल, असे आश्वासन पारखे यांनी दिल्यानंतर सदरचे ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com