संतप्त शेतकर्‍यांसह ग्रामस्थांचे आंदोलन

प्रशासन यंत्रणेवर नाराजी
संतप्त शेतकर्‍यांसह ग्रामस्थांचे आंदोलन

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

बोरी-अंबेदरी धरणातून ( Bori-Ambedari Dam )शेती सिंचनासाठी पाणी देण्यासाठी जलवाहिनी योजनेचे काम तात्काळ सुरू करावे या मागणीसाठी झोडगेसह माळमाथा भागातील शेतकरी-ग्रामस्थांनी महामार्गावर ठिय्या देत रास्तारोको आंदोलन छेडले. या आंदोलनाने महामार्गावरील वाहतूक अर्धा ते पाऊण तास ठप्प झाली होती. संतप्त शेतकर्‍यांनी यावेळी घोषणा देत महामार्ग दणाणून सोडला होता. योजनेच्या समर्थनार्थ झोडगे येथे कडकडीत बंद पाळण्यात आला.

पालकमंत्री दादा भुसे यांनी महामार्ग रोखणार्‍या संतप्त शेतकरी, ग्रामस्थांशी भ्रमणध्वनीवरून संवाद साधला. जलवाहिनी योजनेचे काम शेतकरी हिताचे असल्याने ते लवकरात लवकर सुरू व्हावे यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. कुठल्याही परिस्थितीत आंदोलकांनी कायदा हातात न घेता रास्तारोको मागे घ्यावा, अशी विनंती त्यांनी केल्याने संतप्त आंदोलकांनी रास्तारोको मागे घेतला.

बोरी-अंबेदरी धरणातून पाट कालव्याव्दारे माळमाथ्यावरील दहिदी, वनपट, राजमाने, अस्ताने, लखाने व झोडगे या गावांना शेती सिंचनासाठी पाणी पुरवठा केला जात होता. मात्र खडकाळ व मुरमाड जमीनीमुळे लाभ क्षेत्रातील लखाने, अस्ताने व झोडगे या शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहचत नसल्याने शेती सिंचनाचा प्रश्न बिकट झाला होता. त्यामुळे पाणी गळती रोखण्यासाठी व सर्व शेतकर्‍यांना सिंचनासाठी पाणी मिळावे या दृष्टीकोनातून पालकमंत्री दादा भुसे यांनी पाठपुरावा करत 17 कोटी 85 लाखाची जलवाहिनी योजना शासनातर्फे मंजुर करून आणली होती. मात्र जलवाहिनीमुळे शेतीस पाणी मिळणार नाही अशी हरकत घेत दहिदी परिसरातील शेतकर्‍यांनी 7 नोव्हेंबरपासून धरणावर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. यामुळे मंजूर योजनेचे काम अद्याप सुरू झालेले नाही.

पाण्याअभावी शेती उजाड होत असल्याने जलवाहिनी योजना सर्वांसाठी उपयुक्त असतांना देखील त्यास विरोध होत असल्याने झोडगेसह पंचक्रोशीतील शेतकर्‍यांनी 18 नोव्हेंबररोजी रास्तारोको आंदोलन करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र चार दिवसात योजनेचे काम सुरू केले जाईल, असे आश्वासन प्रांत व पाटबंधारे कार्यकारी अभियंत्यांनी दिल्याने हे आंदोलन स्थगित करण्यात आले होते. मात्र 20 दिवस उलटून देखील जलवाहिनीचे काम सुरू होत नसल्याने आज शेतकर्‍यांसह ग्रामस्थांनी महामार्गावर बसून ठिय्या आंदोलन सुरू केले. शेतकर्‍यांसह महिला देखील मोठ्या संख्येने या रास्तारोको आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. महामार्गावर आंदोलक बसल्याने दोन्ही बाजूस वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.

पालकमंत्री भुसे यांनी शेतकरी हितासाठी जलवाहिनी योजना मंजूर करत निधी देखील आणला आहे. मात्र त्यांना विरोध करण्यासाठी त्यांचे विरोधक या प्रकल्पालाच आडकाठी करत आहेत. प्रशासन यंत्रणा देखील लेखी आश्वासन देवून सुध्दा काम सुरू करत नसल्याचा आरोप संतप्त आंदोलकांनी यावेळी बोलतांना केला. राजकीय विरोध लक्षात घेत प्रशासनाने शेतकरी हितासाठी या योजनेचे काम त्वरीत सुरू करावे, अशी मागणी केली गेली.

यावेळी आंदोलकांनी जलवाहिनी कालव्यास विरोध करणार्‍या भाजप नेते अव्दय हिरे, सुनिल गायकवाड, काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, बारा बलुतेदार मंडळाचे संस्थापक बंडुकाका बच्छाव यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्न केला. पालकमंत्री भुसे यांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात झोडगे सरपंच चंद्रकला सोनजे, उपसरपंच बेबाबाई देसले, माजी सरपंच दीपक देसले, माजी सभापती विजय देसाई, नथू देसले, परेश सोनजे, शरद देसले, प्रविण देसले, अवी शिरसाठ, दीपक पवार, दीपक तलवारे, किशोर देसले, निळकंठ सोनजे, अण्णा इंगळे, शेखर देसले, संतोष चौधरी, शिवाजी शिंदे, सोमनाथ पवार, ग्यानबा देसले, बंटी देसले, संजय कदम, प्रदिप देवरे आदींसह हजारो शेतकरी सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान अनुचित प्रकार घडू नये यास्तव कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com