पंढरपूर
पंढरपूर
नाशिक

वारकऱ्यांचे ३१ ऑगस्टला पंढरपूरमध्ये ठिय्या आंदोलन

मंदिरे उघडण्यास परवानगी मिळत नसल्याने घेतला निर्णय

Vilas Patil

Vilas Patil

पंचाळे |वार्ताहर

सरकारने वारकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने 31 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील एक लाख वारकरी पंढरपूर येथे ठिय्या आंदोलन करणार आहेत. विश्र्व वारकरी सेनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष अरुण महाराज बोरघाटे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे याबाबत माहिती दिली.

वारकरी सांप्रदायातील सर्व वारकरी संघटनांनी सरकारला वेळोवेळी पत्रव्यवहार केला. राज्यातील तहसील कार्यालयांना निवेदन दिले. पंढरपूरला आमरण उपोषण केले. राज्यभरात ठिक-ठिकाणी भजन आंदोलन केले. राजकीय नेत्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना थेट माहिती दिली. मात्र, त्यानंतरही सरकारने भजन-कीर्तन करण्याकरता परवानगी व मंदिर उघडण्याची परवानगी देण्याबद्दल साधी चर्चासुद्धा न केल्यामुळे महाराष्ट्रातील वारकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

वारकरी गावामधे भजन करायला लागले की गावातील नास्तिक मंडळी पोलीस स्टेशनला तक्रार करतात आणि लगेच पोलीस येऊन भजनी मंडळीवर गुन्हे दाखल करतात. आजपर्यंत भजन करणाऱ्या मंडळींवर गुन्हे दाखल झालेले संपूर्ण महाराष्ट्रात कधीही बघायला मिळाले नव्हते. त्यामुळे वारकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सरकारने देशी दारू दुकाने उघडण्यास परवानगी दिली. मॉल उघडली, चित्रपट-मालिकांचे चित्रीकरण करण्यास परवानगी दिली. बँकांच्यासमोर भरपूर गर्दी आहे, लग्नामध्ये, अंत्यविधीमध्ये दिलेल्या नियमापेक्षा जास्त गर्दी आहे. असे असतांना वारकऱ्यांवरच एवढे बंधन का? सरकारचे डोळे उघडण्याकरिता आणि सहन करण्याची क्षमता संपल्यामुळे विश्र्व वारकरी सेना व महाराष्ट्रातील इतर वारकरी संघटना ‘चलो पंढरपूर’ चा नारा देत येत्या 31 ऑगस्टला पंढरपुरात पांडुरंगाच्या मंदिरासमोर ठिय्या आंदोलन करतील. त्यानंतर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्र्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची असेल असा इशाराही या पत्रकात देण्यात आला आहे.

वारकरी संप्रदायातील सर्व संघटना आणि वारकऱ्यांनी एकत्र येेण्याची आवश्यकता आहे. सरकारचा वारकरीविरोधी डाव हाणून पाडायचा आहे. याबाबत महाराष्ट्रातील सर्व तालुक्यातील वारकऱ्यांनी संबंधित तहसील कार्यालयांना ‘चलो पंढरपूर’ बाबतचे निवेदन द्यावे व त्यानंतर सर्वांनी 31 ऑगस्टला शांततेच्या मार्गाने पंढरपूरमध्ये दाखल होऊन ठिय्या आंदोलनात सहभागी व्हावे.

तुकाराम महाराज चौरे,

राष्ट्रीय अध्यक्ष, विश्र्व वारकरी सेना

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com