
मुंजवाड । वार्ताहर Munjvad
बागलाण तालुक्यातील मुंजवाड ते खमताणे ( Munjvad To Khamtane ) दरम्यान असलेल्या इंदिरानगर या आदिवासी वस्तीमधील वहिवाटीचा बंद करण्यात आलेला रस्ता महसूल विभागाने तात्काळ सुरू करून द्यावा. या मागणीसाठी आदिवासी बांधवांनी आरम नदीच्या ( Aaram River ) पुलावर रास्तारोको आंदोलन छेडले.
तब्बल दोन तास सुरू असलेल्या या रास्तारोकोमुळे वाहतूक कोंडी होवून नागरिकांसह विद्यार्थ्यांचे हाल झाले.दरम्यान, आदिवासी बांधवांचे आंदोलन सुरू होताच पोलिसांसह अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रस्ता तात्पुरता सुरु करून सोमवारी (दि. 5) तहसीलदारांकडे संबंधित शेतकरी व ग्रामस्थांची बैठक आयोजीत करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.
इंदिरानगर वस्तीत वास्तव्यास असलेल्या आदिवासी बांधवांना गावात येण्यासाठी गत अनेक दशकांपासून आरम नदीच्या काठालगत पाटाचा रस्ता होता.मात्र पाट बंद झाल्यानंतर पाटाला लागून शेती असलेल्या शेतकर्याने रस्ता आपल्या मालकीच्या शेतातून जात असल्याचे सांगून रस्ता बंद केल्यामुळे वस्तीतील रहिवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विद्यार्थी तसेच रूग्ण व नागरीकांना हा एकमेव जवळचा वहिवाटीचा रस्ता होता. मात्र काही दिवसांपुर्वी या रस्त्यालगत शेती असलेल्या धर्मा सुपडू जाधव यांनी जेसीबीच्या साहाय्याने सदर रस्ता बंद केला होता.
यामुळे आदिवासी बांधव व विद्यार्थ्यांसह रुग्णांची मोठी हेळसांड सुरू झाल्याने हा रस्ता सुरू करावा, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र त्याकडे प्रशासन यंत्रणेने दुर्लक्ष केल्याने संतप्त झालेल्या वस्तीतील रहिवाशांनी आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास मुंजवाड गावाजवळील आरम नदीच्या पुलावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले. तब्बल दोन तास सुरू असलेल्या या आंदोलनामुळे दोन्ही बाजुतील वाहतूक ठप्प होवून वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
या आंदोलनाची माहिती मिळताच पो.नि. सुहास अनुमोलवार, मंडळ अधिकारी मनोज भामरे, तलाठी राजेंद्र गरूड यांनी आंदोलन स्थळी धाव घेत आंदोलकांशी चर्चा केली. संबंधित शेतकरी धर्मा जाधव यांच्याशी फोनवर चर्चा रस्ता तात्पुरता सुरू करण्यात आला व याप्रश्नी सोमवारी तहसीलदारांकडे बैठक घेण्याचे लेखी आश्वासन आंदोलकांना अधिकार्यांतर्फे देण्यात आल्याने रास्तारोको मागे घेण्यात आला.
दरम्यान, संबंधित शेतकरी जाधव यांनी इंदीरा नगर वसाहतीमधील रहिवाशांना जाण्यासाठी एक स्वतंत्र रस्ता आहे. बंद केलेला रस्ता हा माझ्या शेतातून जात असल्याने तो मोठया वाहनांसाठी बंद केलेला आहे. पायी येण्यासाठी मी जागा सोडली असून पायवाटेने जाण्यासाठी रस्ता सुरू असल्याचे सांगीतले.
रास्तारोको आंदोलनात म्हाळु रामदास पवार, बाळू पिंपळसे, दयाराम गांगुर्डे नानाभाऊ गांगुर्डे, अंबादास सोनवणे, भाऊसाहेब सोनवणे, सचिन गांगुर्डे, सुभाष कुंवर, सतीष सोनवणे, गोकुळ आहिरे, सोमनाथ माळी, गणेश ठाकरे , सचिन पिंपळसे, रमेश निकम, सिंधूबाई पिपळसे, वत्सलाबाई मधूकर माळी आदींसह आदीवासी महिला व पुरुष मोठया संख्येने सहभागी झाले होते.