
नाशिक । प्रतिनिधी Nashik
नाशिक महानगरपालिकेतील घंटागाडी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत महापालिकेसमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी कर्मचार्यांच्या विविध प्रश्नांचे निवेदन मनपा आयुक्तांना देऊन त्यांच्याशी चर्चा करण्यात आली असल्याचे नाशिक महानगरपालिका श्रमिक संघाचे उपाध्यक्ष महादेव खुडे यांनी स्पष्ट केले.
नाशिक महानगरपालिकेतील घंटागाडीवर काम करणार्या पंचवटी व नवीन नाशिक भागातील कामगारांच्या सन.2016 ते 2017 या काळातील किमान वेतनाची थकबाकी 1 कोटी 8 लाख रुपये आहे. यासंदर्भात पालिकेत सातत्याने बैठका झाल्या. सदर ठेकेदाराने 16 लाख थकबाकी देणे असल्याचे मान्य करुनही सदर थकबाकी अद्याप कामगारांना मिळाली नाही.
विविध प्रश्नांवर सातत्याने निवेदने देऊन प्रश्न सुटत नसल्याने ते तातडीने सोडवण्याची मागणी मनपा आयुक्तांकडे करण्यात आली. या मागण्यांमध्ये प्रामुख्याने 21 दिवसांच्या भरपगारी रजेच्या संदर्भातसुध्दा सातत्याने बैठका घेऊन कामगारांना सन2011 पासून थकबाकी अद्याप मिळाली नाही. नाशिकरोड भागातील कामगारांना किमान वेतन मागितले म्हणून काम नाकारण्यात आले. सदर कामगारांच्या संदर्भात चौकशी करण्याबाबत डॉ. पलोड यांनी विभागीय अधिकार्यांना पत्र देऊन 3 महिने उलटले, परंतु अद्याप चौकशी झालेली नाही.
याबाबत तातडीने कार्यवाही करण्यात यावी. नवीन ठेक्यामध्ये असलेली वेळ बदलून 6.15 ची सेल्फी बंद करण्याची वेळ बदलून ती 6.30 करण्यात यावी, महापालिका घनकचरा संचालक यांनी सॅग्रीगेशन नागरिकांनी केले पाहिजे, असे बैठकीत सांगूनही कामगारांना ते टेंडरींग पार्टीकडून सक्तीचे करण्यात आले आहे, ते बंद करण्यात यावे, काही भागात कामगारांचे वेतन जुन्या दराने टाकण्यात आले आहे. त्याची चौकशी करुन तातडीने कामगारांना फरक देण्यात यावा.
यासारख्या विविध मागण्यांसाठी संघटनेच्या वतीने महापालिकेसमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कामगारांच्या गर्दीमुळे मुख्यालयाचा प्रवेशद्वार बंद करण्यात आला होता.