मच्छिमारांचा धडक मोर्चा

मच्छिमारांचा धडक मोर्चा

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

गिरणा धरणावरील ( Girna Dam )मासेमारीचा ठेका ( Fishing contract ) मुंबईच्या खासगी ठेकेदारास देण्यात आला आहे. यामुळे धरणावर अवलंबून असलेल्या मालेगाव व नांदगाव येथील सुमारे 10 ते 15 हजार मासेमारी करणार्‍या ( Fishermen )गोरगरिबांवर उपासमारीचे संकट ठाकले आहे. शासनाने हा ठेका त्वरित रद्द करावा व स्थानिक नागरिकांना मासेमारीचे अधिकार द्यावेत या मागणीसाठी प्रहार संघटनेतर्फे ( Prahar Sanghatna) अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.

मासेमारीचे अधिकार स्थानिक व्यावसायिकांना देण्यात यावे, खासगी ठेकेदारी रद्द करा, अशा घोषणा देत कॉलेज स्टॉपपासून सुरू झालेला मोर्चा एकात्मता चौक, कॅम्परोडमार्गे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. या ठिकाणी संतप्त मोर्चेकर्‍यांनी प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष शेखर पगार यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन केले.

अप्पर जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आलेल्या निवेदनात 1967 ते 2017 या कालावधीत गिरणा जलाशयातून स्थानिक मच्छिमार मासेमारी करत होते. या कालावधीत स्थानिकांनी जलाशयामध्ये कधीही रसायन टाकले नाही. शासनाच्या 2017 च्या आदेशामुळे खासगी ठेकेदाराला ठेका देण्यात आला. सदर ठेकेदार पाण्यात रासायनिक केमिकल टाकून मासेमारी करत आहे.

यामुळे लहान मासे व जीवजंतू नष्ट होत आहेत. परिणामी माशांचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे. असेच सुरू राहिल्यास पाच वर्षांनंतर धरणातून मासे नष्ट होतील. त्यामुळे स्थानिक मच्छिमारांवर उपासमारीची वेळ येईल. मालेगाव-नांदगाव तालुक्यातील हजारो कुटुंबीय गिरणा धरणावरील मासेमारीच्या व्यवसायावर अवलंबून आहेत. मात्र राजकीय दबावातून सदर ठेका मुंबईच्या आर्थिकदृष्ट्या सबल ठेकेदारास देण्यात आला आहे.

स्थानिक मच्छिमारांची यामुळे होणारी परवड लक्षात न घेता हा निर्णय घेतला गेला. त्यामुळे आजमितीस हजारो कुटुंबांवर उदरनिर्वाहाचे संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे सदर ठेका रद्द करत स्थानिक मासेमारीचे अधिकार गोरगरीब व्यावसायिकांना देण्यात यावे, अशी मागणी यावेळी संतप्त मोर्चेकर्‍यांनी केली.

या आंदोलनात प्रहार संघटना, आदिवासी परिषद व भोई समाज युवा मंच यांच्यासह प्रहार संघटनेचे विलास खेडकर, संजय शिवदे, विकास मोरे, विशाल वायडे, उमेश पाटील, शुभम भदाणे, सोनू मोरे, रवी माळी, हरी माळी, शिवराम मोरे, महेंद्र मोरे, वामन मोरे, चिंतामण मोरे, दीपक माळी, दादा माळी, अण्णा माळी, रामा सोनवणे, कमलेश सोनवणे यांच्यासह आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com