सोयगावला नागरिकांकडून रास्ता रोको आंदोलन

सोयगावला नागरिकांकडून रास्ता रोको आंदोलन

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

सोयगाव भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर ( Primary Health Center ) मुसळधार पावसामुळे पुन्हा पाणी साचल्याने परिसरास तलावाचे स्वरूप प्राप्त झाल्याने यासह गटार अस्वच्छता आदी समस्यांनी त्रस्त झालेल्या नागरिकांनी मालेगाव-सटाणा रोडवर रास्ता रोको आंदोलन करीत आपला संताप व्यक्त केला. मोठ्या संख्येने महिला या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

करोना corona संकटाच्या पार्श्वभूमीवर मनपातर्फे निधी मंजुरीस विलंब झाला आहे. त्यामुळे मंजूर असलेले रस्त्यांसह गटारीची कामे सुरू होवू शकलेली नाही. मात्र लवकरच निधी मंजूर होणार असल्याने सदर कामे सुरू होवून परिसरातील समस्या मार्गी लागतील, असे आश्वासन उपमहापौर नीलेश आहेर, नगरसेविका आशा अहिरे, जिजाबाई बच्छाव व प्रकाश आबा अहिरे यांनी दिल्यानंतर नागरिकांनी आपले आंदोलन मागे घेतले.

सोयगाव भागातील प्रभाग 10 मध्ये रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. आरोग्य केंद्रासमोर परिसरात तर उखडलेल्या रस्त्यांमुळे पाण्याचे तलाव निर्माण झाले आहेत. दोन दिवस झालेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे सदर परिसर जलमय झाला असल्याने या पाण्यातूनच नागरीकांना मार्गक्रमण करावा लागत आहे. पाण्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने वाहने पडण्याच्या घटना सातत्याने या भागात घडतात.

गटारींची अवस्था देखील दैयनीय झाली आहे. पाण्याचा निचरा होत नसल्याने घाण पाणी रस्त्यावर साचलेले राहत असल्याने त्यातूनच नागरीकांना मार्गक्रमण करत घर गाठावे लागते. या पाण्यामुळे दुर्गंधी पसरून नागरीकांना विविध साथींच्या आजाराचा सामना करावा लागत आहे. रस्ते व गटारींबाबत सातत्याने मनपास निवेदने देण्यात येवून देखील सदर कामांची पूर्तता होत नसल्याने नागरीकांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. परवा झालेल्या पावसामुळे या भागास तलावाचे स्वरूप प्राप्त झाल्याने संतप्त झालेल्या महिलांसह नागरिकांनी मालेगाव-सटाणा रोडवरील सोयगाव प्रवेशव्दारासमोर रस्त्यावर बसून ठिय्या आंदोलनास प्रारंभ केला.

यावेळी संतप्त महिला व नागरीकांनी मनपा प्रशासनाच्या निषेधार्थ घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता. या आंदोलनाची माहिती मिळताच उपमहापौर नीलेश आहेर, नगरसेविका आशा अहिरे, प्रकाश अहिरे यांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. करोनामुळे निधी मंजूर होण्यास विलंब झाला आहे.

या भागातील रस्ते व गटारींची कामे यापुर्वीच मंजूर करण्यात आलेली आहेत. लवकरच निधी उपलब्ध होणार असल्याने सदर प्रलंबित कामे सुरू होतील, असे आश्वासन नगरसेवकांतर्फे देण्यात आल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात आशाबाई अहिरे, कलाबाई पवार, दुर्गा खैरनार, जगदीश साबळे, पिंटू जाधव, सरला शिंदे, शुभम बच्छाव आदींसह सुदामनगर भागातील नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com