पाण्यासाठी भरपावसात आंदोलन

पाण्यासाठी भरपावसात आंदोलन

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक महानगरपालिकेत( NMC ) समाविष्ठ झाल्यापासून पिंपळगाव बहुलाचा( Pimpalgaon Bahula ) विकास हा संथ गतीने होताना दिसून येत आहे. त्याचा प्रत्यय पिंपळगाव बहुला परिसरातील नागरिकांच्या आंदोलनामुळे आला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून पाण्याची समस्या असल्याने पिंपळगांव येथील ग्रामस्थांना आपल्या मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. त्यात प्रामुख्याने पिण्याचे पाणी, घंटागाडी, नालेसफाई, सतत वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्या सातत्याने भेडसावत आहेत.

दरम्यान रविवारी सकाळी पिंपळगाव बहुला येथील महिलांनी डोक्यावर हंडा घेत पिंपळगाव बहुला गावातील समस्या दूर व्हाव्या, यासाठी आंदोलन केले. दरम्यान नाशिक महानगरपालिकेत समावेश होऊनही शहरीकरणाच्या सुविधांपासून वंचित राहावे लागत असल्याने नागरिकांसह महिलांनी तिव्र नाराजी व्यक्त केली. मनपा हद्दीत असताना गावातच समस्यांचा महापूर आल्याने या समस्या दूर तरी कधी होणार, असा प्रश्नदेखील या प्रसंगी उपस्थित करण्यात आला.

संपूर्ण शहरवासीयांची तहान भागवणारे गंगापूर धरण हाकेच्या अंतरावर असताना पिंपळगाववासीयांना पाण्यासाठी वणवण करावी लागणे हे निश्चितच नागरिकांची उपेक्षाच असल्याची भावना व्यक्त होऊ लागली आहे.

अन्यथा रास्ता रोको

पिंपळगाव बहुला गावाच्या हद्दीलगतच तिरडशेत ग्रामपंचायतीची हद्द लागते. या गावच्या नागरिकांनी पाण्यासाठी त्र्यंबकेश्वर रस्त्यावर आंदोलन करुन रास्ता रोको केला होता. त्यावेळी प्रशासनाने त्यांना पाणी देण्याचे मान्य केले होते. मात्र पिंपळगाव बहुला हे गाव नाशिक महानगरपालिकेत असूनही नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. आता यासाठी आम्हीपण रास्ता रोको करावा काय? असा सवाल पिंपळगाव बहुलाच्या महिलांनी उपस्थित केला होता.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com