जिल्हा रुग्णालय
जिल्हा रुग्णालय
नाशिक

जिल्हा शासकीय रूग्णालयात एजंटगिरी

कर्मचार्‍यांची बदनामी, कारवाईची मागणी

Gaurav Pardeshi

Gaurav Pardeshi

नाशिक । प्रतिनिधी

जिल्हा रूग्णालयात चांगली सेवा मिळण्यासाठी पैसे द्यावे लागत असल्याचे सांगत रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना लुटण्याचे प्रकार वाढले आहेत. यामध्ये कायम वावर असणार्‍या एजंटाचा सामावेश असल्याचे समोर येत आहे. हे एजंट परिचारीका तसेच डॉक्टरांची बदनामी करत असल्याने त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी वैद्यकीय कर्मचार्‍यांनी केली आहे.

जिल्हा रूग्णालयात वाढलेल्या एजंटगिरीच्या परिणामी रूग्णांची लूट होत असल्याची अनेक उदाहरणे पुढे येत आहेत. अशाच प्रकारे चार दिवसांपुर्वी इगतपुरी तालुक्यातील खडले या गावातील पत्नीला बाळंतपणासाठी घेऊन आलेल्या युवकास जिल्हा रूग्णालयात कामय वावर असणार्‍या पगारे नामक एजंटंने गाठले.

पत्नीचे बाळंतपण व्यवस्थीत व लवकर होण्यासाठी येथील डॉक्टर व परिचारीकांना पैसे द्यावे लागतील असे सांगत त्याच्याकडून 2 हजार रूपये रक्कम घेतली. त्या व्यक्तीसमोरच एजंटने डिलीव्हरी कक्षातून चक्कर मारली. यानंतर तो गायब झाला.

पत्नीच्या बाळंपणानंतर सबंधीत व्यक्तीने परिचारीकांना याबाबत विचारणा केली असता, त्यांनी जिल्हा रूगाणालयात बाळंपणासाठी तसेच केस पेपर काढल्यानंतर कोणत्याही उपचारांसाठी पैसे लागत नसल्याचे स्पष्ट केले.

सबंधीत एजंटने फसवल्याचे लक्षात येताच युवकाने सरकारवाडा पोलीस ठाणे गाठुन तक्रार दिली मात्र पोलीसांनी तक्रार घेतली नसल्याचा आरोप त्याने केला. अखेरीस याबाबतचे निवेदन जिल्हा शल्यचिकित्सकांना त्याने देत आपली झाली परंतु एजंटकडून इतर कोणाची फसवणुक होऊनये अशी मागणी केली.

दरम्यान जिल्हा रूग्णालयात अनेक एजंट वावरत असून रूग्णांच्या नातेवाईकांकडून पैसे गोळा करणे, रूग्णांना इतर रूग्णालयात पळवणे, झटपट उपचार, रक्तपिशवी मिळवून देण्याच्या नावे येथे आलेल्या गरीब व आडाणी रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांची लूट होत आहे. तसेच यामध्ये डॉक्टर व आरोग्य कर्मचार्‍यांची बदनामी केली जात असल्याने अशा एजंटवर कडक कारवाई करण्याची मागणी कर्मचार्‍यांनी केली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com