माजी जिल्हाधिकारी कुशवाह यांना पुन्हा समन्स

आनंदवली भूमाफिया प्रकरणात 15 महसूल अधिकार्‍यांची चौकशी
माजी जिल्हाधिकारी कुशवाह यांना पुन्हा समन्स

नाशिक । प्रतिनिधी

आनंदवली भूमाफिया प्रकरणाच्या गुन्ह्यात नाशिक पोलिसांनी आतापर्यंत प्रातांधिकारी, तहसीलदार, तलाठी, सर्कल अशा महसूल विभागातील किमान 15 ते 16 अधिकारी व सेवकांंची चौकशी झाली आहे. जमिन कागदपत्रात झालेली खाडाखोड आणि त्यानंतर सातबारा उतार्‍यातील फेरफार या प्रकरणात चौकशी करण्यासाठी शहर पोलिसांनी माजी जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंग कुशवाह यांना पुन्हा समन्स पाठवले आहे.

आनंदवली येथील शेतकरी रमेश मंडलिक या वृद्धाची जमीन बळकवण्यासाठी नियोजनपूर्व पद्धतीने हत्या करण्यात आली. याच गुन्ह्यात पोलिसांनी पहिल्यांदा भूमाफियांविरोधात महाराष्ट्र संघटीत कायद्यानुसार कारवाई केली आहे. सध्या गुन्ह्यातील संशयित आरोपी पोलिसांच्या कोठडीत असून, त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे.

मोक्का तपासासाठी मिळालेल्या मुदतीचा फायदा पोलिसांना मिळाला असून, यामुळे गुन्ह्याचे पाळेमुळे शोधली जात आहे. रमेश मंडलिक यांची जमीन बळकवण्यासाठी त्यांच्या जमीनच्या कागदपत्रांमध्ये खाडाखोड करण्यात आली होती. तर याच आधारे सातबारा उतार्‍यात फेरफार करण्यात आला होता. या प्रकरणी मंडलिक यांनी तत्कालीन जिल्हाधिकार्‍यांना अर्ज सादर केला. तसेच जिल्हाधिकार्‍यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आणि तोपर्यंत निर्णय राखून ठेवण्याचे आदेश दिले होते. मात्र, प्रत्यक्षात तसे झालेच नाही. त्यामुळे मंडलिक यांनी न्यायालयात दावा दाखल केला.

सुनावणीअंती कोर्टाने सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. गुन्हा दाखल झाला मात्र संशयित आरोपींनी हायकोर्टातून स्टे ऑर्डर घेतली. त्यामुळे पुढे तपासच झाला नाही. परिस्थिती जै थे राहिल्याने अखेर दीड महिन्यांपूर्वी संशयितांनी मिळून मंडलिक यांची हत्या केली.

मोक्का तपासात महसूलच्या अधिकारी व सेवकांंची चौकशी सुरू आहे. हे सर्व त्या निर्णय प्रक्रियेशी निगडीत आहे. मात्र, चौकशीअंती यातील जबाबदार व्यक्ती कोण हे शोधले जाणार आहे. सर्वच अधिकारी व कर्मचारी दोषी आहेत असे नाही. या अधिकार्‍यांची मागील काही दिवसांमध्ये चौकशीसुद्धा झाल्याचे पोलीस सूत्रांनी स्पष्ट केले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com