पुन्हा एकावर बिबट्याचा हल्ला

ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
पुन्हा एकावर बिबट्याचा हल्ला

सिन्नर। वार्ताहर Sinnar

तालुक्यातील कासारवाडीत (Kasarwadi) पुन्हा एकदा बिबट्याने (Leopard) एकावर हल्ला करुन जखमी केल्याची घटना रविवारी (दि. 27) रात्री 8.30 च्या सुमारास घडली.

विलास महाराज कांडेकर हे रात्री दुचाकीवरून गावातून मळ्यात निघाले होते. बाळूमामा देवस्थानकडे जाणार्‍या रस्त्यावर माधव शेळके यांच्या मळ्याजवळ आले असता अचानक एक बिबट्या त्यांच्या दुचाकीला आडवा आला. अचानक बिबट्या समोर आल्याने कांडेकर यांनी दुचाकीचा वेग वाढवताच बिबट्याने दुचाकीचा पाठलाग करत त्यांच्यावर हल्ला केला.

सुदैवाने कांडेकर यांनी तेथून पळण्यात यशस्वी झाले. या बिबट्यासोबत एक पिल्लुही असल्याचे कांडेकर यांचे म्हणणे आहे. गावात येत याबाबतत्यांनी सरपंच सुनिल सांगळे व माजी उपसरपंच सचिन देशमुख यांना माहिती दिली. त्यांनी त्वरित वनरक्षक अक्षय रुपवते (forest ranger akshay rupvate) यांना संपर्क साधून परिसरात पिंजरा (Cage) लावण्याची मागणी केली. आज (दि. 27) परिसरात पिंजरा लावण्यात आला आहे.

बिबट्याच्या हल्लयाची तिसरी घटना

काही दिवसांपूर्वी गावातील देशमुख वस्तीकडे जाणार्‍या रस्त्यावर संदीप कासार हा युवक दुचाकीने जात असताना त्याच्यावर बिबट्याने हल्ला केला होता. बिबट्याने पंजा मारल्याने त्याच्या पोटास जखम झाली होती. तेव्हाही परिसरात पिंजरा लावण्यात आला होता. मात्र, बिबट्या त्यात अडकला नाही. यानंतर काही दिवसांनीच गावातून बाळूमामा देवस्थानकडे जाणार्‍या रस्त्यावर प्रतिक देशमुख यांच्या चारचाकीला बिबट्या आडवा झाला होता.

मात्र, चारचाकी असल्याने बिबट्याला काही करता आले नाही. यावेळी देशमुख यांनी बिबट्याचा मुक्त वावर आपल्या मोबाइलमध्ये कैद केला होता. मात्र, रविवारी कांडेकर यांच्यावर हल्ला झाल्यावर त्या बिबट्यासोबत पिल्लू असल्याचे त्यांना दिसले. त्यामुळे तो मादी बिबट्या असल्याचे समोर आले असून जवळपास असलेल्या उसाच्या शेतात या मादीने पिल्लांना जन्म दिला असावा असे जाणकारांचे म्हणणे आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com